कोल्हापूर
Flood situation in Kolhapur महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढल्याने नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पात्र ओलांडले आहे. दुसरीकडे, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठाही वाढला आहे. कृष्णा खोऱ्यात संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची मागणी कर्नाटक सरकारकडे केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी २८ फूट ८ इंचांवर पोहोचली असून जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात ७६ टक्के, तर काळम्मावाडी धरणात ४२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप सुरू असली, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस कायम आहे.

पुणे शहर आणि परिसरातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा १८.०२ टीएमसीवर पोहोचला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ६१.८१ टक्के आहे. खडकवासला धरणात ६४.७५ टक्के, पानशेतमध्ये ६७.२६ टक्के, वरसगावमध्ये ६१.८५ टक्के आणि टेमघर धरणात ४४.४० टक्के पाणीसाठा आहे.येत्या आठवड्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धरणांमधील वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन पुणे महापालिकेने २२ जुलैपर्यंत शहरातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रासह मुक्त पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने नदीच्या प्रवाहात वेगाने वाढ होत आहे. जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यंदा अलनिनोचा प्रभाव सक्रिय असल्याने काही भागांत अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक सरकारला आंतरराज्य समन्वय बैठकीत झालेल्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.मान्सूनच्या काळात कृष्णा नदीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हिप्परगी बॅरेजची सर्व गेट पूर्णपणे खुली ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. २० जुलै रोजी सकाळी ८ वाजता हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी ५२२.६० मीटर होती. त्यावेळी धरणात ३६,४०० क्युसेक्स पाण्याची आवक, तर ३४,४५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.को. प.बंधारा राजापूर येथे पाणीपातळी ५२४.४८३ मीटर नोंदवण्यात आली असून तेथून ३५,२०८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ऑगस्टच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१७.०० ते ५१७.५० मीटरच्या दरम्यान ठेवण्याची मागणी महाराष्ट्राने केली आहे. सध्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१७.६८० मीटर असून धरणात ४०,१७३ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. मात्र, विसर्ग १६,४५८ क्युसेक्स इतकाच सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या मते, अतिवृष्टीच्या परिस्थितीत कृष्णा नदीचा प्रवाह सुरळीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग तातडीने वाढवणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.