मॉस्को,
Four Indians killed in Russian attack युक्रेनच्या किनाऱ्याजवळून प्रवास करणाऱ्या गिनी-बिसाऊ ध्वजांकित व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीय नागरिकांसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून, व्यापारी जहाजे आणि त्यावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवाया तातडीने थांबवण्याचे आवाहन केले आहे.युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी युक्रेनच्या सागरी मार्गावरून जाणाऱ्या एका नागरी व्यापारी जहाजावर रशियाने हल्ला केला. या जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये भारतीय आणि सीरियन नागरिकांचा समावेश होता. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारतीय खलाशांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, गिनी-बिसाऊच्या ध्वजाखाली प्रवास करणाऱ्या जहाजावर क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर पाच भारतीय नागरिकांसह एकूण १७ कर्मचारी होते.परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध करताना व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि निष्पाप नागरी कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात घालणे ही निंदनीय बाब असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालयाच्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी संध्याकाळी ओडेसा बंदरातून निघाल्यानंतर एमव्ही गोल्डन लिओवर हा हल्ला झाला.
हल्ल्यानंतर चार भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एका भारतीय नागरिकावर रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. युक्रेनमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, पीडितांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांप्रति भारताने तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमी भारतीय नागरिकाच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.रशियाचे थेट नाव न घेता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजांवर हल्ले करणे, निष्पाप कर्मचाऱ्यांचे प्राण धोक्यात घालणे आणि नौकानयन तसेच व्यापाराच्या स्वातंत्र्यात अडथळा निर्माण करणे हे निंदनीय असल्याचे म्हटले आहे. अशा घटना टाळल्या गेल्या पाहिजेत, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. पाश्चात्य माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात मृतांची संख्या दहा झाली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच ही घटना घडली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे रशियावर जोरदार टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे एक सामान्य नागरी जहाज होते, त्यावर आंतरराष्ट्रीय कर्मचारी वर्ग कार्यरत होता आणि जगाच्या अन्नसुरक्षेत योगदान देणाऱ्या मार्गावरून ते प्रवास करत होते. तरीही ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आणखी एक लक्ष्य ठरले, असा आरोप त्यांनी केला.