गोंदिया,
gang-of-truck-robbers-busted : रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रकचालकाला मारहाण करून तांदूळ भरलेला ट्रक लुटल्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या कारवाईत सुमारे 18 लाख 13 हजार 699 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संजय राजकुमार दमाहे (20) रा. कोहका, ता. जि. गोंदिया असे या आरोपीचे नाव आहे. त्याला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील हनुमानगंज येथील ट्रकचालक रामचंद्र मौर्य (35) हा चाकघाट (मध्यप्रदेश) येथून नागपूरकडे तांदळाची वाहतूक करीत होता. 17 जुलै रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास सावरी बसस्थानकाजवळ झोप येत असल्याने त्याने ट्रक थांबवून विश्रांती घेतली. याचवेळी अज्ञात इसमांनी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने त्याच्याशी वाद घालत मारहाण केली. त्यानंतर चालकाचे हातपाय बांधून ट्रकसह तांदूळ लंपास केला. या प्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संजय दमाहे याने साथीदारांसह ही लूट केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपीच्या कबुलीवरून चोरीचा तांदूळ तीन वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथून अनुक्रमे 11 टन 320 किलो, 11 टन 460 किलो आणि 7 टन 270 किलो असा एकूण 30 टनांहून अधिक तांदूळ जप्त केला. तसेच लुटलेला ट्रकही ताब्यात घेण्यात आला. या कारवाईत सुमारे 8 लाख 13 हजार 699 रुपयांचा तांदूळ आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण 18 लाख 13 हजार 699 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी रावणवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.