गोंदियातील दोन तांदूळ गिरणी मालक एसआयटीच्या ताब्यात!

- मध्यप्रदेशातील तांदूळ घोटाळा ः इतर तांदूळ गिरणी चालकांवरही कारवाईची शक्यता

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
sit-custody : मध्य प्रदेशातील फोर्टीफाइड तांदूळ घोटाळ्याचा तपास करणार्‍या विशेष तपास पथक (एसआयटी) ने गोंदिया शहरात कारवाई करत येथील खंडेलवाल राईस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल या दोन तांदूळ गिरणी चालकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून दोघांवर एफसीआयच्या गोदामातून निर्यात केलेला फोर्टीफाइड तांदूळ एशियन प्लांटच्या नावाखाली खरेदी करून त्याचा अवैध व्यापार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील इतर तांदूळ गिरणी चालकांवरही कारवाई होणार असल्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
 
 
sit-custody
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी, मध्यप्रदेशातील तांदुळ घोटाळाप्रकरणी एसआयटीने 8 जणांना अटक केल्याची माहिती असून खंडेलवाल बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर ही संख्या 10 झाली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी, एशियन प्लांटचा ऑपरेटर गोविंद खेडा, वित्त व्यवसायात गुंतलेली एक बाप-बेट्याची जोडी, मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील काही तांदूळ गिरणी चालक, वाहतूकदार आणि इतर संबंधित व्यक्ती अद्याप फरार आहेत. दरम्यान, आतापर्यंत पथकाकडून एशियन प्लांटचा प्रतिनिधी राहुल प्रताप, भूपालजिंदर रेकेरा श्रीवास्तव, सिवनीचा वाहतूकदार उवैद खान आणि ट्रक चालक दुर्गेश शेंडे यांच्यासह अनेक आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण नेटवर्कद्वारे कोट्यवधी रुपयांचा सरकारी मालकीचा पौष्टिक तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केला गेला असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात एशियन प्लांटच्या नावाखाली एफसीआयच्या गोदामातून फोर्टीफाइड तांदूळ उचलण्यात आला आणि तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्याऐवजी विविध तांदूळ गिरण्यांमध्ये उतरवून बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून काही आरोपींनी तशी कबूली दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
 
5 हजार मेट्रिक टनांहून अधिक तांदूळ जप्त...
 
 
एसआयटीनुसार, आतापर्यंत 5 हजार मेट्रिक टनांहून अधिक पौष्टिक तांदूळ जप्त करण्यात आला आहे, ज्याचे अंदाजित मूल्य 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय, पोलिसांनी ‘एशियन प्लांट’ च्या नावाने विविध तांदूळ गिरण्यांमध्ये तांदूळ वाहून नेणारे 20 हून अधिक ट्रक जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
 
जिल्ह्यात कारवाई झाली की, नाही याबाबत कसलीही माहिती नसून तसे अधिकृत कोणतेही पत्र किंवा माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आलेली नाही.
गोरख भामरे, जिल्हा पोलिस अधीक्षक, गोंदिया