शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी

*महसूलसह विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
pravinkumar-deore : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ’छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांद्वारे महसूल विभागासह विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.
 
 
j
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २१ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ए. डी. डिघुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव तसेच ऑनलाईनव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.
 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात २२ जुलै, २६ जुलै आणि १ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार संघनिहाय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै मातोश्री लॉन्स (सिंदखेड राजा), प्रतापराव जाधव शेतकरी भवन (मेहकर), श्री हरी लॉन्स (खामगाव) आणि शिवसृष्टी मंगल कार्यालय, वानखेड फाटा (संग्रामपूर). २६ जुलै ओमकार लॉन्स, मलकापूर.
 
 
१ ऑगस्ट आराध्य लॉन्स, चिखली रोड, बुलढाणा ३ ऑगस्ट मौनी बाबा संस्थान, चिखली या शिबिरांमध्ये शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये महिला शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमितीकरण, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, ’जिवंत सातबारा’ मोहीम, सिंधी विस्थापितांसाठी विशेष अभय योजना, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसायास प्रोत्साहनपर सवलती तसेच शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याच्या निर्णयाचा लाभ आदींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. तसेच शिबिरांमध्ये नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय योजनांशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या अभियानामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार असून शासकीय सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सर्व लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळे, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच आपल्या तक्रारींचे तत्काळ निवारण करून घ्यावे असे आवाहन केले.