मुंबई,
Intense rainfall in Maharashtra महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा पावसाच्या सरींची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी सकाळी १० वाजता राज्यातील १० जिल्ह्यांसाठी हवामानाचा इशारा जारी केला. पुढील ३ तासांत या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये पावसाच्या सरींसह आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

पावसामुळे रस्ते निसरडे होणे, वाहतुकीचा वेग कमी होणे आणि काही ठिकाणी दृश्यमानता घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. वाहनचालकांनी विशेष काळजी घेऊन वाहन चालवावे, असेही सांगण्यात आले आहे. पावसाच्या काळात शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानात झपाट्याने बदल होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिकृत हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.