बुएनोस आयर्स,
Messi's emotional post after the defeat २०२६ च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भावुक झाला आहे. विजेतेपदाचा बचाव करण्यात अर्जेंटिनाला अपयश आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मेस्सीने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतिम सामन्यातील पराभव वेदनादायी असल्याचे सांगतानाच, संपूर्ण स्पर्धेतील अर्जेंटिनाच्या कामगिरीचा आणि संघाच्या प्रवासाचा आपल्याला अभिमान असल्याचे त्याने म्हटले आहे.चार वर्षांपूर्वी मिळवलेल्या विश्वचषक विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने अर्जेंटिनाने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील संघाने बाद फेरीत अनेक कठीण प्रसंगांवर मात केली. १६ संघांच्या फेरीत इजिप्तविरुद्ध दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर अर्जेंटिनाने जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धही संघाने अखेरच्या क्षणी शानदार पुनरागमन केले.
मात्र, अंतिम सामन्यात लुईस दे ला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखालील स्पेनच्या मजबूत संघाने अर्जेंटिनाचा विजेतेपदाचा प्रवास थांबवला. ‘ला रोजा’ने गतविजेत्या अर्जेंटिनाला पराभूत करत पुन्हा एकदा फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले.पराभवानंतर मेस्सीने इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या पराभवाची वेदना अत्यंत तीव्र आहे आणि त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रवासातील चांगल्या आठवणी तो कायम जपून ठेवणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. संघाने ज्या सामन्यांमध्ये सर्वस्व पणाला लावले आणि कठीण परिस्थितीतून विजय मिळवला, ते क्षण कायम स्मरणात राहतील, असे मेस्सीने म्हटले.
संघाच्या कामगिरीसोबतच संपूर्ण अर्जेंटिना देशाने दिलेल्या पाठिंब्याचाही मेस्सीने विशेष उल्लेख केला. खेळाडूंच्या मेहनतीसोबत देशवासीयांच्या पाठिंब्यामुळे अर्जेंटिनाला पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवता आले, असे त्याने सांगितले.सलग दोन विश्वचषकांच्या अंतिम सामन्यांपर्यंत पोहोचणे ही मोठी कामगिरी आहे. या यशाचे पूर्ण महत्त्व सध्या समजून घेणे कठीण असले, तरी संघाने जे साध्य केले आहे त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मेस्सीने म्हटले. चाहत्यांनी पाठवलेल्या प्रत्येक अभिनंदनाच्या संदेशाबद्दल मेस्सीने आभार मानले. पुन्हा एकदा संपूर्ण राष्ट्र एकत्र आले आणि अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान अनुभवला, असेही त्याने सांगितले. त्याचबरोबर मेस्सीने फिफा विश्वचषक जिंकल्याबद्दल स्पेनच्या संघाचे अभिनंदन केले.