विवाहित प्रेयसीला लग्नाची मागणी घालून गैरवर्तन

- प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
misconduct-with-a-married-lover : विवाहित असलेल्या प्रेयसीने लग्नाची मागणी घालणाऱ्या प्रियकराला नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने प्रेयसीला मारहाण करीत तिच्याशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. शाहरूख मोहम्मद मन्सुरी (वय २८, हिरवी नगर, वाठोडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 
 
 

ngp 
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय महिला सुजाता (बदललेले नाव) ही पूर्वी प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत होती. २०१८ मध्ये तिची ओळख पंचर दुकान चालविणारा शाहरूख मोहम्मद मन्सुरी याच्याशी झाली. गेल्या चार वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. सुजाताने शाहरुखला लग्नाची गळ घातली असता त्याने कुटुंबियांचा विरोध असल्याचे सांगून लग्नास टाळाटाळ केली. त्यामुळे सुजाताने भंडारा येथील एका युवकासोबत लग्न केले.
 
 
तिला सध्या एक मुलगी असून ती गेल्या काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. त्यावेळी तिची भेट पूर्वीचा प्रियकर शाहरुखशी झाली. त्याने तिला भेटायला बोलावले. दोघांची भेट झाली. त्यावेळी त्याने एका हत्याकांडाच्या गुन्ह्यात काही दिवस मध्यवर्ती कारागृहात असल्याची बाब तिला सांगितली. तसेच अधिक माहिती काढली असता त्याच्यावर पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याचे समोर आले. त्यामुळे सुजाताने त्याच्यापासून दुरावा केला. मात्र, शाहरुखने तिला धमकी देऊन लग्नाची गळ घातली. १९ जुलैला त्याने सुजाताला भेटायला बोलावले आणि लग्न न करण्याची मागणी केली. तिने नकार देताच सुजाताला मारहाण केली आणि अश्लील वर्तन केले. तिचा मोबाईल हिसकावला आणि निघून गेला. घाबरलेल्या सुजाताने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अक्षय गवांदे यांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करीत आरोपी शाहरुख मंसुरीला अटक केली.