आंतरराष्ट्रीय,
प्रा. जयसिंग यादव,
nepal-gen-z-protest : नेपाळचा राजकीय इतिहास हा नेहमीच अस्थिरतेच्या आणि अचानक येणाऱ्या परिवर्तनांच्या लाटांनी वेढलेला राहिला आहे. राजेशाहीचा अंत, माओवादी बंडखोरी आणि त्यानंतर लोकशाहीचा स्वीकार अशा अनेक वळणांवरून गेलेला हा देश सध्या पुन्हा एकदा एका मोठ्या अंतर्गत संघर्षाच्या आणि तीव्र असंतोषाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मार्च २०२६ च्या निवडणुकांमध्ये ज्या ‘जनरेशन झेड’ म्हणजेच तरुण पिढीने एका मोठ्या क्रांतीची अपेक्षा ठेवून रॅपर आणि काठमांडूचे माजी महापौर बालेंद्र शाह (बालेन शाह) यांच्या हाती देशाची सूत्रे सोपवली होती, तीच तरुण पिढी आज त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. ज्यांनी सत्तेच्या शिखरावर बसवले, त्यांनीच अवघ्या काही महिन्यांमध्ये विरोधाचा झेंडा हाती घेतल्यामुळे नेपाळमधील हा संघर्ष केवळ राजकीय उरलेला नाही, तर एका सामाजिक आणि आर्थिक असंतोषाचा ज्वालामुखी बनला आहे. या ताज्या आंदोलनांची ठिणगी काठमांडूच्या रस्त्यांवर पडली. एका राईड-शेअरिंग ड्रायव्हरने (गणेश नेपाळी) म्युनिसिपल पोलिसांसोबत झालेल्या वादामधून आणि प्रशासकीय जाचाला कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर तरुणांच्या संतापाचा उद्रेक झाला, परंतु हे केवळ एका घटनेचे तात्कालिक पर्यवसान नाही. या आंदोलनामागे खोलवर रुजलेली कारणे आहेत. शाह यांच्या सरकारने शहराच्या सुशोभीकरणाच्या आणि शिस्तीच्या नावाखाली हजारो गरीब आणि भूमिहीन झोपडीधारकांना पुनर्वसनाशिवाय बेघर केले. गरिबांना थेट रस्त्यावर आणणाऱ्या या मोहिमांमुळे प्रशासकीय क्रूरतेचा चेहरा समोर आला आणि नेपाळमध्ये नव्याने आंदोलन पेटले.

आर्थिक संकट, बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे आधीच होरपळत असलेल्या नेपाळी तरुणांना नवीन सरकारकडून रोजगाराच्या संधी आणि सहानुभूतीची अपेक्षा होती; परंतु त्याऐवजी त्यांना दंडात्मक कारवाया, प्रशासकीय हुकूमशाही आणि गरिबांना टार्गेट करणारी धोरणे पाहायला मिळाली. त्यामुळे नेपाळमध्ये आता थेट व्यवस्थेविरुद्ध आणि आश्वासनांचा भंग करणाऱ्या नेतृत्वाविरुद्ध लढा सुरू झाला आहे. शाह यांच्या विरोधातील या तीव्र नाराजीचे विश्लेषण करताना त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. शाह हे पारंपरिक नेपाळी राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांसाठी बदलाचा एक मोठा चेहरा म्हणून पुढे आले होते. त्यांचा आक्रमक आणि स्पष्टवक्ता स्वभाव तरुणांना आकर्षित करत होता; मात्र सत्तेवर आल्यानंतर हाच आक्रमक स्वभाव एकाधिकारशाही आणि असंवेदनशीलतेमध्ये बदलल्याचा आरोप आता होत आहे. विरोधकांचे म्हणणे ऐकून न घेणे, ‘सोशल मीडिया’ आणि माध्यमांवर अघोषित बंधने आणण्याचा प्रयत्न करणे आणि जमिनीवरील गरिबांच्या वास्तववादी समस्यांकडे पूर्णपणे डोळेझाक करणे, यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची घसरली आहे. आंदोलक आणि विरोधक आता त्यांना ‘काळा चष्मा’ काढून जनतेची खरी परिस्थिती पाहण्याचे आवाहन करत आहेत. ज्या लोकशाही आणि मानवी हक्कांच्या नावावर त्यांनी तरुणांची मते मिळवली, त्याच हक्कांची पायमल्ली नव्या राजवटीत होत असल्याचा सूर उमटत असल्यामुळे शाह सध्या कमालीचे बचावात्मक भूमिकेत आले आहेत.
नेपाळमधील या अंतर्गत राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचे पडसाद केवळ त्यांच्या सीमांपुरते मर्यादित राहू शकत नाहीत, कारण नेपाळचे भारताशी असलेले संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेली खुली सीमा ही एका बाजूने दोन्ही संस्कृतींना जोडणारा दुवा असली, तरी नेपाळमधील अस्थिरतेच्या काळात ती भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठी चिंतेची बाब ठरते. नेपाळमध्ये अंतर्गत संघर्ष वाढल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सीमेपलीकडून होणारी गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी आणि भारतविरोधी घटकांची घुसखोरी वाढण्याचा थेट धोका निर्माण होतो. याशिवाय, नेपाळमध्ये जेव्हा जेव्हा अंतर्गत असंतोष किंवा राजकीय पोकळी निर्माण होते, तेव्हा चीनसारख्या परकीय शक्तींना तिथे आपला प्रभाव वाढवण्याची मोठी संधी मिळते. शाह यांच्या अनपेक्षित आणि काहीशा लहरी परराष्ट्र धोरणामुळे भारतासोबतच्या सीमावादाचे विषय पुन्हा उफाळून आले होते. आता त्यांच्याच देशात सुरू असलेल्या यादवीमुळे या द्विपक्षीय संबंधांमध्ये अधिक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेपाळमधील सद्यस्थिती ही दक्षिण आशियातील तरुण पिढीच्या आक्रोशाचे आणि लोकशाही व्यवस्थेकडून असलेल्या अवास्तव अपेक्षेचे प्रतीक आहे. नेपाळला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शाह यांना त्यांच्या प्रशासकीय भूमिकेत बदल करून गरिबांना आणि तरुणांना विश्वासात घ्यावे लागेल.
दरम्यान, भारतासाठी हा काळ अत्यंत सावधगिरीने पावले टाकण्याचा आहे. नेपाळचा हा अंतर्गत संघर्ष शांत व्हावा आणि तिथे स्थिर सरकार राहावे, यातच भारताचेही हित सामावले आहे. शेजारी देशातील शांतता हीच भारताच्या सीमेवरील सुरक्षेची सर्वांंत मोठी हमी असू शकते. नेपाळने गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण आशियातील सर्वाधिक वेगाने बदलणारे राजकारण अनुभवले आहे. पारंपरिक राजकीय पक्षांविरुद्ध तरुणांनी उभा केलेला जनक्षोभ, भ्रष्टाचाराविरोधातील संताप, बेरोजगारी, प्रशासनातील उदासीनता आणि नव्या नेतृत्वाविषयी निर्माण झालेली प्रचंड अपेक्षा या सगळ्यांच्या पृष्ठभूमीवर शाह यांच्या नेतृत्वाला मोठा जनाधार मिळाला; मात्र अवघ्या काही महिन्यांमध्ये त्याच तरुणांपैकी मोठा वर्ग रस्त्यावर उतरला आहे. ज्यांनी बदलाची स्वप्ने पाहून नव्या नेतृत्वाला सत्तेपर्यंत पोहोचवले, तेच आता सरकारच्या विरोधात उभे राहिल्याने नेपाळच्या लोकशाहीसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अलिकडील आंदोलनाची ठिणगी एका तरुणाच्या आत्मदहनाच्या घटनेतून पडली असली, तरी त्यामागे दीर्घकाळ साचलेला सामाजिक आणि राजकीय असंतोष आहे. भूमिहीनांच्या बेदखलीच्या कारवाया, पोलिसांच्या कथित कठोर वर्तनाविरोधातील नाराजी आणि शासनाच्या निर्णयप्रक्रियेबद्दलचा रोष एकत्र येत आंदोलनाचे व्यापक रूप घेत गेले.
शाह यांचा उदय हा नेपाळच्या पारंपरिक राजकारणावरील अविश्वासाचा परिणाम होता. दीर्घकाळ सत्तेत राहूनही प्रमुख पक्ष बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई आणि प्रशासनातील अकार्यक्षमता दूर करू शकले नाहीत. त्यामुळे ‘सोशल मीडिया’वर सक्रिय, थेट संवाद साधणारे आणि पारंपरिक राजकीय घराण्यांपासून दूर असलेले शाह हे बदलाचे प्रतीक बनले. विशेषतः ‘जनरेशन-झेड’ने त्यांच्याकडे एका नव्या राजकीय संस्कृतीच्या आशेने पाहिले. निवडणुकीतील त्यांचा विजय हा केवळ राजकीय नव्हता, तर नेपाळमधील तरुणांच्या अपेक्षांचा विजय मानला गेला; मात्र सत्ता मिळवणे आणि सत्ता चालवणे यात मोठा फरक असतो. आंदोलनातून निर्माण झालेल्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा अत्यंत मोठ्या होत्या. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई, पारदर्शक प्रशासन, रोजगारनिर्मिती, सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा आणि सामाजिक न्याय या आघाड्यांवर जलद परिणाम दिसतील, अशी अपेक्षा होती; पण प्रत्यक्षात प्रशासनातील जटिलता, आर्थिक मर्यादा आणि धोरणात्मक अडथळ्यांमुळे अपेक्षित वेगाने बदल घडू शकले नाहीत. यामुळे समर्थकांमध्येच निराशा वाढू लागली. नेपाळमधील सध्याचे आंदोलन ही केवळ एका घटनेविरोधातील प्रतिक्रिया नाही. ते विश्वासभंगाचे आंदोलन आहे. लोकशाहीत जनतेचा पाठिंबा कामगिरीवर टिकून राहतो, हे या घटनांमधून स्पष्ट होते. नेपाळमध्ये बेरोजगारी हे अजूनही मोठे आव्हान आहे. मोठ्या प्रमाणावर नेपाळी युवक रोजगारासाठी परदेशात जात आहेत. देशांतर्गत उद्योग आणि गुंतवणुकीचा वेग अपेक्षेइतका वाढलेला नाही. महागाई, अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमांमुळे अनेक कुटुंबांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
राजकीय दृष्टिकोनातून पाहिले तर नेपाळमध्ये ‘व्यक्तिकेंद्री बदल’ किती टिकाऊ असतो, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. आंदोलनातून निर्माण झालेल्या सरकारने प्रशासनातील सुधारणा करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी केली नाही, तर लोकांचा विश्वास डळमळीत होणे स्वाभाविक आहे. या संपूर्ण परिस्थितीकडे भारताने केवळ शेजारी देशातील अंतर्गत राजकारण म्हणून पाहता कामा नये. भारत आणि नेपाळ यांचे संबंध सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्याही अतिशय जवळचे आहेत. बिघडलेल्या संबंधांचा पहिला परिणाम सुरक्षा व्यवस्थेवर होऊ शकतो. खुल्या सीमेमुळे अस्थिरतेच्या काळात तस्करी, बनावट चलन, शस्त्रांची हालचाल किंवा गुन्हेगारी नेटवर्क सक्रिय होण्याचा धोका वाढतो. भारत आणि नेपाळ यांच्यातील सुरक्षा सहकार्य त्यामुळे अधिक महत्त्वाचे ठरते. याशिवाय भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. सीमावर्ती भागातील आंदोलन, वाहतूक अडथळे किंवा प्रशासनातील अस्थिरता यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. त्याचा परिणाम दोन्ही देशांमधील उद्योग आणि सीमाभागातील अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.)