खैबर पख्तुनख्वा,
pakistan-floods : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पाऊस आणि पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. विविध घटनांमध्ये अठरा जण जखमीही झाले आहेत. हवामान विभागाने सध्या आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, हवामान विभागाने स्थानिक रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा आणि घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. विविध घटनांमध्ये चौदा घरांचे नुकसान झाले आहे.
मृतांमध्ये पाच मुलांचा समावेश
अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, वायव्य पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. विविध घटनांमध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून, पाच मुलांसह १८ जण जखमी झाले आहेत. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (PDMA) अहवालानुसार, छप्पर आणि भिंती कोसळल्याने आणि अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात लोक वाहून गेल्याने हे मृत्यू झाले. मृतांमध्ये सहा पुरुष, पाच मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींमध्ये ८ पुरुष, २ महिला आणि ८ मुलांचा समावेश आहे.
१४ घरांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, या घटना पेशावर, खैबर, मरदान, बुनेर, बाजोर, लोअर चित्राल, अॅबोटाबाद, मानसेहरा, तोरघर आणि कुर्रम जिल्ह्यांमध्ये घडल्या आहेत. पीडीएमएच्या (PDMA) माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे एकूण १४ घरांचे नुकसान झाले आहे. एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, तर उर्वरित घरांचे अंशतः नुकसान झाले. पीडीएमए, रेस्क्यू ११२२, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित विभाग मदत आणि बचाव कार्यात गुंतले होते. पीडीएमएच्या महासंचालकांनी जिल्हा प्रशासनांना बाधित कुटुंबांना तात्काळ मदत साहित्य पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
हवामानाची सद्यस्थिती काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांतातील सर्व प्रमुख नद्या, ओढे आणि जलमार्गांमधील पाण्याची पातळी आणि प्रवाह सामान्य मर्यादेत राहिले आहेत. तथापि, पाकिस्तान हवामान विभागाने २५ जुलैपर्यंत संपूर्ण प्रांतात अधूनमधून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पीडीएमएने लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, धोकादायक पर्यटन स्थळांपासून दूर राहण्याचे आणि नद्या, ओढे व पाण्याने भरलेले रस्ते टाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना अधिकृत हवामान सूचना आणि सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा सल्लाही देण्यात आला. सर्व जिल्हा प्रशासनांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे प्राधिकरणाने सांगितले.