‘तुमच्यामुळेच जगलो...म्हणून तुमच्यासोबतच वाढदिवस’

महिला पोलिसांनी केला वृद्धाचा बर्थडे साजरा

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |

rt57
 
 
अनिल कांबळे
नागपूर, 
police officers celebrated an elderly man's birthday एका वृद्धाचा भरोसा सेलमध्ये फोन आला. त्यांनी आजारी असल्याचे सांगून पोलिसांना मदत मागितली. चार महिला पोलिस कर्मचारी दामिनी पथकाचे वाहन घेऊन थेट वृद्धाच्या घरी पोहचल्या. अगदी मरणासन्न अवस्थेत आजारी असलेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल केले. वृद्धाला वेळीच उपचार मिळला आणि काही दिवसांत ते ठणठणीत बरे झाले. पोलिसांनी केलेली मदत वृद्धाच्या आठवणीत होती. वृद्धाने पुन्हा भरोसा सेलला फोन केला आणि वाढदिवसाला घरी येण्याचे आमंत्रण दिले. पाच ते सहा महिला पोलिस कर्मचारी वृद्धाच्या घरी गेल्या. मोठ्या आनंदात त्यांचा वाढदिवस साजरा केला. ‘मी पोलिस विभागाचा ऋणी आहे. तुमच्यामुळेच जगलो...म्हणून तुमच्यासोबतच वाढदिवस साजरा करायचा होता.’ असे म्हणून त्या वृद्धाचे डोळे पाणावले. या भावनिक क्षणात महिला पोलिसांच्याही नकळत डोळ्याच्या कळा ओल्या झाल्या. पोलिसांच्या या कृतीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
 
 
pokice
 
 
मुधोजी कुकडे हे ७८ वर्षीय वृद्ध अंबाझरीतील नंदा अपार्टमेंटमध्ये राहतात. ते आजारी होते. त्यांना मदत करण्यासाठी कुणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी लगेच भरोसा सेलला फोन केला. ‘माझी प्रकृती ठिक नाही, मला मदतीची गरज आहे.’ असे आर्त हाक पोलिसांना दिली. भरोसा सेलच्या दामिनी पथकात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदार प्रीती थोटे, रेखा कावळकर, सोनाली उईके, रिना जाऊरकर आणि रोशनी बोरकर या दामिनी पथकाचे वाहन घेऊन घरी गेल्या. त्यांनी आजारी वृद्धाला दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी लगेच तपासणी करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. वृद्धाने महिला पोलिसांना आभार व्यक्त केले. काही दिवसानंतर कुकडे हे ठणठणीत बरे झाले.
 
 
 
वाढदिवस साजरा करण्याची इच्छा
मुधोजी यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी मदतीस धावून येणाऱ्या महिला पोलिसांसोबत साजरा करण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यांनी पुन्हा भरोसा सेलला फोन करुन माहिती दिली. महिला पोलिसांनीही मोठ्या आनंदाने होकार दिला. पोलिस हवालदार प्रीती थोटे, रेखा कावळकर, सोनाली उईके, रिना जाऊरकर आणि रोशनी बोरकर या मुधोजी यांच्या घरी पोहचल्या. केक कापून त्यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. एका अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा वाढदिवस साजरा करण्याचा भावणिक क्षण सर्वांनी अनुभवला.
 
 
 
 
ज्येष्ठ नागरिक सेलचे ऋणानुबंध
भरोसा सेलमध्ये वृद्धांना मदत करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेल आहे. यामध्ये कार्यरत महिला पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी केल्या जाते. त्यांचा डाटा अपडेट करण्यात येते. त्यांचे जवळचे नातेवाईक, डॉक्टर, रक्त गट आणि शेजाऱ्यांचे मोबाईल नंबर नोंद करण्यात येते. नोंदणी केल्यानंतर त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे काम भरोसा सेल करीत असते. ज्येष्ठ नागरिक सेलच्या माध्यमातून पोलिस वृद्धांशी ऋणानुबंध कायम ठेवतात.
  
 
 
आजारी ज्येष्ठ नागरिकाला भरोसा सेलद्वारे मदत करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करुन आम्ही कर्तव्य बजावले. त्यांनी ऋणानुबंध म्हणून आम्हाला वाढदिवसाला आमंत्रित केले. त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
- वर्षा मते (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल)