नागपूर विमानतळावर पोर्टर सुविधा सुरू होणार

-यासंदर्भात तीन कंपन्यांशी चर्चा -पोर्टर सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
porter-service : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा आणि आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता जीएमआर कडून एअरपोर्ट्सच्या विकास कामांना सुरुवात केली जात आहे. नागपूर विमानतळावर सध्या हमाल सुविधा उपलब्ध नाही; मात्र प्रवाशांनी एअरलाइनमार्फत विनंती केल्यास लवकरच शुल्क आकारून पोर्टर सुविधा सुरू करण्याचे नियोजित असल्याची माहिती जीएमआर नागपूर एअरपोर्ट्सने स्पष्ट केले आहे.

nagpur-airport-.png1 
 
तब्बल ९ वर्षांपासून पोर्टर सेवा बंद
 
मुख्यत: नागपूर विमानतळावरील सुविधेसंदर्भात तीन कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याने लवकरच हमाल सुविधा उपलब्ध होईल. नागपूर विमानतळावर तब्बल ९ वर्षांपासून पोर्टर सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: पहाटेच्या आंतरराष्ट्रीय विमानांमधून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होत आहे.
 
 
जीएमआर कडून विकास कामे
 
नागपूरला मध्य भारतातील प्रमुख विमान वाहतूक, कार्गो आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित करण्यासाठी जीएमआर कंपनी सज्ज झाली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कोटी रुपयांची विकास कामे केल्या जाणार आहे. नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळूनही नागपूर विमानतळावर गेल्या नऊ वर्षांपासून पोर्टर सेवा उपलब्ध नसल्याने ट्रॉली ढकलण्याचे काम करावे लागते.
 
कतार एअरवेजची विमाने पहाटेची
 
महासंचालनालयाच्या नियमांनुसार, प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोर्टर सुविधा असणे आवश्यक आहे. विमानतळाचा परवाना मिळवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागपूर विमानतळावर एअर अरेबियाची शारजा-नागपूर-शारजा आणि कतार एअरवेजची दोहा-नागपूर-दोहा ही दोन्ही विमाने पहाटे ३:३० ते ५ च्या दरम्यान उड्डाण घेतात किंवा लॅण्डिंग करतात. या आंतरराष्ट्रीय विमानांमधून दररोज अनेक वृद्ध प्रवासी प्रवास करतात. परदेश प्रवासामुळे त्यांच्यासोबत भरपूर सामान असते. विमानतळाबाहेर सामान नेण्यासाठी किंवा त्यांचे वाहन आणण्यासाठी त्यांना पोर्टरची गरज असते. दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानांतील प्रवाशांना रात्री १ च्या सुमारास विमानतळावर पोहोचावे लागते.