मुंबई.
Production warrant against Anmol Bishnoi राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. सरकारी पक्षाच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अनमोल बिश्नोईविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यास मंजुरी दिली. सध्या तो ज्या न्यायालयाच्या ताब्यात आहे, तेथून त्याला या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईतील न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे.बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात त्यांच्या मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास सुरू असून, प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी अनमोल बिश्नोईविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अमेरिकेतून भारतात हद्दपार झाल्यानंतरही अनमोल बिश्नोईला ताब्यात घेण्यात आले नसल्याने यापूर्वी विशेष न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी सरकारी पक्षाचा अर्ज मंजूर करत अनमोल बिश्नोईला सध्या ज्या न्यायालयाच्या ताब्यात आहे, तेथून या प्रकरणात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी मोहम्मद यासीन अख्तर उर्फ सिकंदर उर्फ जस्सी आणि शुभम लोणकर उर्फ शुब्बू यांच्याविरुद्धही न्यायालयाने घोषणापत्र जारी केले आहे. या दोघांविरोधात यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असल्याचे न्यायालयीन नोंदीत नमूद आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनीही या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनमोल बिश्नोईची कोठडी मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आवश्यक पावले उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने तपास यंत्रणेला तिच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत गंभीर गुन्ह्यांच्या तपासात अनावश्यक विलंब होऊ नये, असे स्पष्ट केले.