देहव्यापार प्रकरणानंतर अनधिकृत अतिथी विश्रामगृहावर प्रशासनाचा हातोडा

*बसस्थानकासमोरील बांधकाम पोलिस बंदोबस्तात पाडण्यास सुरुवात

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
आर्वी,
prostitution-case : शहरातील बसस्थानकासमोरील पुरुषोत्तम स्टोअर्सच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका अतिथी विश्रामगृहात सुरू असलेल्या कथित देहव्यापार प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित अनधिकृत बांधकामावर मंगळवार २१ रोजी हातोडा चालविला. पोलिस बंदोबस्तात नगर परिषदेकडून बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली.
 
 
 
jk
 
 
 
बांधकामाची नगर परिषदेकडून मंजुरी न घेता बांधलेल्या अतिरित पुरुषोत्तम स्टोरच्या दोन माळ्याचे तोडकाम नपने हाती घेतले. पुरूषोत्तम रावलानी यांना नगर परिषदेने यापूर्वी सन २०१९ मध्ये अतिरीत बांधकाम काढण्याकरिता नोटीस बजावली होती, मात्र कारवाई केली नाही. याच इमारतीत अतिथी विश्रामगृहाच्या नावावर लॉज सुरू केला. अतिथी विश्रामगृहामध्ये अवैध देह व्यापार होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अनेकवेळा या लॉजवर धाड टाकली. मात्र, कायद्यातील संरक्षणामुळे तो बचावला. शेवटी येथील ठाणेदार सतीश डेहणकर यांनी योजना आखून ८ जुलैला बोगस ग्राहक (पंटर) पाठवुन धाड टाकली आणि पुरूषोत्तम रावलानी यांच्यावर कारवाई करण्यात आली.
 
 
नगरपरिषदेने ९ जुलै रोजी नोटीस देवून कारवाईची माहिती दिली. या नोटीसमध्ये रावलानी यांनी अवैध बांधकाम स्वतः पाडावे, अन्यथा नगर परिषदेकडून ते पाडण्यात येईल. त्यासाठी लागणारा खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल. याशिवाय ९ लाख रुपयाचा दंड सुद्धा ठोठावला. पुरूषोत्तम रावलानी याने ८ लाख रुपये तर भरलेच शिवाय न्यायालयात सुद्धा गेले. मात्र त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. शेवटी नप मुख्याधिकारी विक्रम शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली २१ रोजी पोलिस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
 
 
या संपूर्ण कारवाईत ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता. शहरात बेकायदेशीर व्यवसाय आणि अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, अशाच प्रकारच्या नियमबाह्य बांधकामांवर आणि अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.