अग्रलेख...
images and talent ‘सेलिब्रिटी’ किंवा ‘उत्सवमूर्ती’ नावाचे वलय व्यक्तिमत्त्वाला प्राप्त झाले म्हणजे आपल्या प्रत्येक शब्दाला अधिकाराची धार आपसूकच प्राप्त होते असा समज समाजमाध्यमांच्या जमान्यात बळावणे साहजिक असले, तरी जेव्हा ही माध्यमे फोफावणे तर दूरच, जन्मालादेखील आली नव्हती आणि त्यांच्याबाबतचे भविष्यदेखील कोणी जाणले नव्हते, तेव्हा आपल्या अफाट प्रतिभाशक्तीच्या आणि जगण्याचे शिकविलेल्या प्रत्येक धड्यातील अनुभवांना प्रतिभेचे लेणे चढवून बेतलेल्या शब्दांच्या आधारावर व्यक्त होणाऱ्या काही आदरणीय व्यक्तिमत्त्वांंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर कालातीत स्वरूपाचे काही भाष्य केले. दररोज उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत पुढे सरकणाऱ्या काळाच्या ओघात वाहत राहिलेले काही क्षेत्रांच्या परिस्थितीचे प्रवाह आजकालच्या साचलेपणामुळे त्याच त्याच जागी फिरू लागले असले, तरी त्याही परिस्थितीवर त्या प्रतिभावंतांचे ते शब्द कायमचे कोरल्यागत अक्षर स्वरूपात उमटून राहिले. गेल्या शतकाच्या अखेरच्या पंचविशीत, कविवर्य विंदा करंदीकर, कवी वसंत बापट, मंगेश पाडगांवकर यांसारख्या कवींच्या संवेदना त्या काळातील एकूणच सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या रेट्याने पिचलेल्या समाजाच्या वेदना पाहून आणि प्रत्यक्ष अनुभवूनही अस्वस्थ झाल्या आणि त्यांच्या प्रतिभेला स्वानुभवाने लगडलेल्या शब्दांचे ताकदवान पंख लाभले.
त्या भराऱ्यांतून या वेदना कवितांच्या रूपाने शब्दांचा साज घेऊन दाहकपणे समाजासमोर आल्या आणि त्या शब्दांनी त्या परिस्थितीच्या कारणीभूतांवर आसूडही ओढले. कारण, त्या प्रत्येक अक्षरातील अस्वस्थपणात केवळ अस्सलपणा होता. त्यांच्या कोणत्याही शब्दावर सुपारीबाजपणाचा आरोप ठेवण्याची हिंमत त्या शब्दांनी जखमी झालेल्यांना किंवा पोळलेल्यांनादेखील करता आली नसती, एवढा प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दांत होता. याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी आपली प्रतिभा, आपल्या संवेदना किंवा आपली शब्दसंपत्ती कोणा एखाद्याच्या चरणी बहाल केली नव्हती. त्या शब्दांना स्वाभिमानाचा स्पर्श होता, म्हणून त्यांना अव्हेरण्याची हिंमत करणे महागात पडेल याची जाणीव ठेवूनच समाजानेही त्यांचा आदर केला. कवीच्या शब्दात अशी ताकद तेव्हाच निर्माण होते, तेव्हा त्याचे शब्द स्वतंत्र, स्वाभिमानी आणि प्रामाणिक संवेदनशीलतेने लगडलेले असतात! केवळ, मागणीनुसार शब्दांचा रतीब घालण्याचा धंदेवाईकपणा त्यांच्या शब्दांना आणि प्रतिभेला शिवलेलादेखील नसतो, त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला मान्यता मिळतेच आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचे ‘उत्सवमूर्ती’ असण्याचे वलयदेखील असे उजळून निघते. ते शब्द कालातीत ठरतात आणि पुढच्या काळातील कोणत्याही परिस्थितीशी तुलना करण्याची ताकदही त्यांमध्ये अटळपणे प्रस्थापित होते. विंदांच्या अशा कितीतरी कवितांनी समाजाच्या वेदना मांडल्या, सत्तेवर आणि सत्ताधीशांवर संयत आसूडही ओढले, सामाजिक अस्वस्थतेमागील घुसमटदेखील शब्दबद्ध केली आणि त्या काळातील एकूणच परिस्थितीचे अभंग असे कायमस्वरूपी चित्रण अक्षररूपाने उमटवून ठेवले. वसंत बापटांच्या कवितांनाही तशीच, स्वाभिमानाची, अस्वस्थ जाणिवांची आणि वेदनेची धार होती. पाडगावकरांनी आपल्या शैलीत हीच परंपरा जपली आणि कवी हा केवळ त्या क्षेत्रातील ‘सेलिब्रिटी’ नसतो, तर समाजाचा ‘जागल्या’ म्हणून काम करण्याची स्वयंस्फूर्त जबाबदारी पेलणारा राखणदार असतो, हे सिद्ध झाले. सर्वसामान्य समाज आपल्यापुढील समस्यांशी झगडण्याच्या आणि संघर्षाच्या वेदनांना सामोरे जाण्याच्या कसरतीत आपली सारी शक्ती पणाला लावत असताना काहीसा दुबळा होऊन जातो. आपल्या समस्यांचे ओझे वाहणेदेखील अवजड होत असताना समाजाच्या समस्यांचे ओझे पाठीवर घेण्याची त्याची उमेद कमीच झालेली असते. अशा वेळी, मौन राहिले तर या समस्यांना वाचा फुटणार कशी आणि समस्याग्रस्तांना वाली राहणार कोण अशी स्थिती जेव्हा येते, तेव्हा कवीच्या प्रखर जाणिवांना प्रतिभेचे पंख फुटतात आणि जे सर्वांस दिसत नाही, ते पाहणारे त्याचे दिव्य मनश्चक्षू त्या वेदना अक्षरशः चव्हाट्यावर आणून त्यांच्याच हाती शब्दांचे आसूड सोपवितात.
गेल्या शतकातील अखेरच्या काही दशकांत अशा जळजळीत जिवंतपणाशी जवळीक असलेल्या कविता आता काळाच्या प्रवाहात मात्र काहीशा गढूळल्या आहेत किंवा कसे, याची शंका यावी असा सूर घेऊन समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ वगैरे होताना दिसतात. अर्थात, हे सध्याच्या कवितेचे सार्वत्रिक चित्र नव्हे, पण आढीत पिकत घातलेल्या आंब्याच्या राशीतील एखाद्या नासक्या आंब्याचे काम करणाऱ्या काही कविता मात्र, एकूणातच कवितांच्या प्रांतांत गढूळपणा पसरवू लागल्या की काय अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती मात्र नक्कीच दिसते. म्हणूनच, गढूळलेल्या कवितांच्या समाजमाध्यमांवरील गर्दीला दर्दी काव्यप्रेमींची दाद मिळत नसली, तरी त्या फोफावतात आणि त्याचीच चर्चा अधिक होते. कवितेसारख्या साहित्यविश्वातील श्रेष्ठ क्षेत्राची अशी अवस्था होत असतानाही, विंदा, बापट, पाडगावकरांसारख्या श्रेष्ठ कवींच्या कालातीत कवितांच्या रांगेत त्यांना बसविण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते अधिक चिंताजनकही आहे.
मराठी साहित्यात कविवर्य विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकरांसारख्या सिद्धहस्त, प्रतिभावान कवींनी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी कविता खऱ्या अर्थाने समृद्ध केली. आधुनिक काळात कवींच्या गर्दीत आता नेते किंवा अभिनेत्यांसारख्या ‘सेलिब्रिटीं’च्या शब्दप्रतिभेलाही पंख फुटू लागले असले तरी त्यांच्या शब्दांतून उमटणाऱ्या सामाजिक, राजकीय पर्यावरणाविषयीच्या चिंतेवरच शंकेची पुटे चढलेली दिसत आहेत. विंदांच्या कवितेनेही त्या काळात, ‘जनतेचे राज्य’ नावाच्या कवितेचे झणझणीत अंजन समाजाच्या डोळ्यात घातले होते. त्यांच्या ‘सगळेच कसे सपक सपक’ या कवितेने समाजाच्या अस्वस्थ सुस्तीवर आणि राजकारणातील मूल्यहीनतेवर चिंता व्यक्त केली होती. ‘देशाचा नेता कसा? सपक… जनता कशी? सपक…’ या शब्दांतून उमटणाऱ्या प्रामाणिक अस्वस्थतेचीही त्या काळी चर्चा झाली. त्यातील नकारात्मक सुरांवर बोटेदेखील ठेवली गेली आणि त्यांना त्याबद्दल टीकादेखील सहन करावी लागली. आणिबाणीसारख्या काळ्या कालखंडामुळे उमटलेल्या अस्वस्थपणातून शब्दबद्ध झालेल्या कवितांमधून काही शब्द वगळावेही लागले, पण त्यांच्या कवितेवर कधीच सुपारीबाजपणाचा किंवा धंदेवाईकपणाचा ठपका बसला नव्हता. पाडगांवकर, विंदा किंवा बापट यांसारख्या कोणाही कवीच्या कवितेतून निर्माण झालेल्या वादाला स्वार्थाचा किंवा आर्थिक लोभ वा लाभाच्या संशयाचा स्पर्शदेखील नव्हता आणि हे समाजाला खात्रीपूर्वक ठावूक होते. सत्तेला आरसा दाखविणे हे कवीचे कर्तव्य असते हे खरेच, पण सोयीस्करपणे असा आरसा हाती घेऊन तो कोणा विशिष्ट वेळी सत्तेसमोर धरणे त्यांना कधीच जमले नाही. आजच्या काळातील अनेक कवितांमध्ये राजकीय सोयीनुसार वापरणे सोयीचे व्हावे अशा शब्दांची लयलूट दिसते, तेव्हा ज्या माध्यमांच्या मंचावरून त्या जगजाहीर होतात, त्याच मंचावर त्यांचे वाभाडेदेखील निघतात. केवळ उत्सवमूर्ती किंवा सेलिब्रिटी म्हणून एखाद्या क्षेत्रातील प्रतिष्ठा प्राप्त झाली की त्याचे वजन वापरून कोणत्याही क्षेत्रात लुडबूड करण्याचा अधिकार स्वतःकडे घेण्याची प्रसिद्धीची एक सोपी रीत अलिकडे विकसित होताना दिसत आहे. समाजाला ते जेव्हा जाणवते, तेव्हा अशा गल्लाभरू शब्दांचे वजन आपोआप कमी होतेच, पण कवितेसारख्या समृद्ध दालनाची प्रतिष्ठादेखील पणाला लागते. अलिकडच्या काही कविता केवळ सरकारांना किंवा सत्तेलाच लक्ष्य का करतात, त्यांना समाजातील उणिवा दिसत नाहीत का, त्या उणिवांनी त्यांची तथाकथित प्रतिभावंत मने अस्वस्थ होत नाहीत का, असे अनेक प्रश्न यामुळेच अलिकडे वारंवार विचारले जाऊ लागले आहेत. ते वास्तविक असेल, तर ते वर्तमानाच्या प्रवाहात वाहवत जाण्यासारखेच ठरेल. कवितेच्या प्रांताने अशा वागवत जाण्यापासून सावध राहावयास हवे. कोणे एके काळी कवी हा समाजसौख्याचा राखणदार म्हणून ओळखला जात असे. आता समाजास कवितांचा राखणदार म्हणून काम करावे लागणार असेल, तर कवितांचा पुढचा काळ कसा असेल याचा गंभीर विचार व्हावयास हवा. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा साहित्याचा स्वभावच असतो. मात्र, या प्रश्नांना प्रामाणिक अस्वस्थतेची जोड असावयास हवी. अन्यथा, प्रसंगानुरूप निर्माण होणारे प्रश्न अशाच प्रसंगांच्या वेळी कोठे दडी मारतात अशी शंका घेण्यास वाव मिळतो. जुन्या काळातील कवींनी कोणत्याच राजकीय पक्षाशी स्वतःस बांधून घेतले नव्हते, त्यामुळे कोणा एका पक्षाची पाठराखण करण्यासाठी आपल्या प्रतिभेला वेठीस धरणे किंवा कोणा एका पक्षाच्या विरोधासाठी प्रतिभेचा लिलाव मांडणे त्यांना कधीच जमलेदेखील नाही. जेव्हा समाजासमोरील प्रश्न उग्र होतात, तेव्हा लोकभावना शब्दांत मांडणे ही आपली पहिली भूमिका आहे, हे त्यांना माहीत होते. कवितेच्या प्रांताचे तसे संस्कारच होते. असे संस्कार पुन्हा एकदा जागविण्याची गरज अधूनमधून अधोरेखित होऊ लागली आहे. कारण, बदलत्या संदर्भांमुळे आणि असहिष्णुतेमुळे सध्याचे वाद अधिक गडद होऊ लागले आहेत, संवेदनशीलताही नाजूक होत चालली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करू नये, पण अभिव्यक्तीचा अतिरेकही होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कारण साहित्याच्या प्रांताची तशी परंपरा आहे.