चंद्रपूर,
ruckus-over-parking : चंद्रपूर पोलिस मुख्यालयातील पावनगड क्वार्टर परिसरात गाड्यांच्या पार्किंगवरून महिला पोलिस कर्मचारी व तिच्या पतीने हवालदाराच्या पत्नीला शिवीगाळ करून राडा केला. या प्रकरणी महिला पोलिस आणि तिच्या पतीविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकूम येथील पोलिस मुख्यालयातील पावनगड क्वार्टर इमारतीमध्ये तक्रारदार रिना रवींद्र मडावी या आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे पती रवींद्र मडावी हे चंद्रपूर पोलिस विभागात कार्यरत असून, सध्या वरोडा पोलिस ठाण्यात मुख्य शिपाई म्हणून सेवा बजावत आहेत. मडावी दांपत्याची होंडा अमेज कार ही पावनगड इमारतीच्या खाली असलेल्या पार्किंग परिसरात ठराविक जागेत उभी होती. शनिवार, 18 जुलै रोजी सकाळी तक्रारदाराचे पती कामानिमित्त बाहेर गेले असताना सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या क्वार्टरच्या वरच्या मजल्यावर राहणारी आणि सध्या गोंडपिंपरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलिस कर्मचारी उज्ज्वला टेकाम ही रिना मडावी यांच्या घराच्या दरवाजावर आली. तिने मडावी यांना पार्किंगमधील कार काढण्यास सांगत तिथे स्वतःची कार पार्क करायची आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत, असे सांगितले. यावर रिना मडावी यांनी पती बाहेर गेले असून, ते परत आल्यावर कार बाजूला काढतील, असे सांगून वाद नको म्हणून आपल्या पतीचा मोबाईल नंबर उज्ज्वला टेकाम हिला दिला.
मात्र, दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास इमारतीच्या खाली पार्किंग परिसरातून मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळीचा आवाज येऊ लागला. रिना मडावी यांनी गॅलरीतून खाली पाहिले असता उज्ज्वला टेकाम, तिचा पती शंकर कन्नाके, तिचा भाऊ व एक अनोळखी व्यक्ती तेथे उपस्थित होते. दारूच्या नशेत असलेला शंकर कन्नाके हा रवींद्र मडावी यास उद्देशून अत्यंत घाणेरड्या भाषेत आरडाओरड करीत होता. गाडी न काढल्यास फोडून टाकण्याची धमकी देत होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून रिना मडावी खाली आल्या असता, आरोपी शंकर कन्नाके याने त्यांचा रस्ता अडवला आणि शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मडावी यांच्या पतीला रस्त्यात अडवून मारून टाकण्याची आणि तक्रारदाराला विधवा करण्याची उघड धमकी दिली.
या प्रकारानंतर आरोपी शंकर कन्नाके याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या होंडा अमेज कारवर लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि दगडाने बेछूट मारहाण करत तोडफोड केली. यामध्ये वाहनाचे सुमारे 80 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरीकडे, आरोपी महिला पोलिस उज्ज्वला टेकामही देखील स्वतःच्या पतीला चिथावणी देत सतत अश्लिल शिवीगाळ करत होती. काही वेळातच आरोपी शंकर कन्नाके हा स्वतःच्या घरात गेला आणि हातात उघडा चाकू घेऊन पुन्हा पार्किंगच्या ठिकाणी आला. या भयानक प्रकारामुळे घाबरलेल्या रिना मडावी यांनी तातडीने आपल्या मुलांना सोबत घेऊन स्वतःच्या क्वार्टरमध्ये पळ काढला, असे तक्रारीत म्हटले आहे. रिना मडावी यांच्या लेखी तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात आरोपी शंकर कन्नाके आणि महिला पोलिस उज्ज्वला टेकाम यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.