नामची,
Tunnel collapses in Sikkim. सिक्कीममधील नामची जिल्ह्यात तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. समारदुंग म्हणजेच झोलुंगे परिसरातील बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर अनेक कामगार आत अडकल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ कामगारांचा मृत्यू झाला असून, आणखी १९ जण बोगद्यात अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोगद्याच्या बाहेरील भागात अचानक मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. माती आणि दगडांचा ढिगारा कोसळल्याने बोगद्यात काम करणारे अनेक मजूर आत अडकले. दुर्घटनेच्या वेळी बोगद्यात मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याचे काही बाहेर पडलेल्या कामगारांनी सांगितले आहे. त्यानंतर बोगद्यात मिथेन वायूची गळती झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नामची जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या अंदाजानुसार १९ कामगार अद्याप बोगद्यात अडकलेले असू शकतात. यामध्ये प्रकल्पाशी संबंधित कर्मचारी तसेच इतर कामगारांचा समावेश आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह विविध सरकारी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहेत.अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, एनएचपीसी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पथके संयुक्तपणे बचाव मोहीम राबवत आहेत.
मात्र, बोगद्यात मिथेन वायूचे प्रमाण वाढल्याचा संशय असल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काही जवानांनाही वायूमुळे त्रास झाल्याची माहिती आहे. त्यातच बोगद्याचा अरुंद मार्ग, कोसळलेला माती-दगडांचा ढिगारा आणि कमी दृश्यता यामुळे बचावकार्य अधिकच कठीण झाले आहे. अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव पथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.