मध्यप्रदेशात समान नागरी संहिता विधेयक मंजूर

मुख्यमंत्री यादव म्हणाले, वेगवेगळे धार्मिक मापदंड स्वीकारणार नाही

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |

 

भोपाळ
ucc in mp मध्य प्रदेश विधानसभेत समान नागरी संहिता (यूसीसी) विधेयक मंजूर करण्यात आले. विराेधकांच्या गदारोळात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, जे हिंदूंसाठी बोलतील तेच राज्य करतील. समानता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. देवाच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत़ मग माणसाने बनवलेल्या कायद्यांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी का असाव्यात?, देशात सर्व नागरिकांसाठी समान कायदे असले पाहिजे, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्री यादव पुढे म्हणाले, रामापासून रहीमपर्यंत, रवींद्रापासून रॉबिनपर्यंत, अमरापासून अँथनी आणि अकबरापर्यंत, देशावर एकाच संविधानानुसार राज्यकारभार झाला पाहिजे. समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीनंतर मध्य प्रदेश भेदभावापासून मुक्त होईल आणि गोवा, उत्तराखंड आणि आसामच्या पावलावर पाऊल ठेवून या दिशेने पाऊल उचलणाऱ्या निवडक राज्यांच्या गटात हे राज्य सामील होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

mohan yadav 
 
 
ucc in mp विराेधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले, या लोकांचे खाण्यासाठी वेगळे दात आहेत आणि दाखवण्यासाठी वेगळे दात आहेत. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. आम्ही आमच्या दोन मुलांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून का पाहतो, याचे स्पष्टीकरण विराेधकांनी द्यावे़ त्यांच्या वक्तव्यादरम्यान विरोधी पक्षांनी विरोध सुरूच ठेवला़ परंतु मुख्यमंत्र्यांनी सभागृहासमोर सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडत मध्य प्रदेशात कोणताही वेगळा धार्मिक तराजू असणार नाही. सर्वांना समान वजनाने तोलले जाईल, असे स्पष्ट केले.


९३ टक्के नागरिकांचा यूसीसीला पाठिंबा

ucc in mp राज्यातील ९३ टक्के नागरिकांनी समान नागरी संहितेला पाठिंबा दिला आहे, असा दावा करत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाची विचारसरणी अशी आहे की, ते साध्या गोष्टींकडेही एका विकृत दृष्टिकोनातून पाहतात. राज्यातील नागरिकांचे सामाजिक आणि धार्मिक विधी पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तथापि, राज्यात होणाऱ्या सर्व विवाहांची शासकीय नोंदणी अनिवार्य असेल. नोंदणी न केल्यास दंड आकारण्यात येईल. पत्नी असताना दुसरे लग्न करण्यास पतीला आणि पती असताना दुसरे लग्न करण्यास पत्नीला परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.