वर्धा,
matruvandana : कुपोषण, माता व बाल मृत्यूला आळा बसावा, या हेतूने केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान मातृवंदना योजना कार्यान्वित करण्यात आली. सध्या या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जि. प.च्या महिला व बाल कल्याण विभागाला देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ५ हजार तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास लाभार्थी महिलेला ६ हजार रुपयांचे अनुदान दोन टप्प्यात दिले जाते. १५ जून ते १५ जुलै या कालावधीत राज्यभर विशेष लाभार्थी नोंदणी मोहीम राबविण्यात आली. यात वर्धा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या विशेष नोंदणी मोहिमेदरम्यान जिल्ह्याला १३०७ लाभार्थ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. एक महिन्याच्या कालावधीत तब्बल १८८७ पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आल्याने जिल्ह्याने १४२.८२ टके उद्दिष्टपूर्ती साध्य करत राज्यात अव्वल स्थान मिळविले.
गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत पंतप्रधान मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र महिलांपर्यंत पोहोचावा, कोणतीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये आणि नोंदणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी., जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या मार्गदर्शनात जि. प. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनिषा कुरसंगे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात विशेष लाभार्थी नोंदणी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमधील सेविकांनी संबंधित कालावधीत गृहभेटी देत संबंधित योजनेच्या लाभास पात्र ठरणार्या महिलांची नोंदणी करून घेतली.
वर्धा जिल्ह्याला १३०७ नोंदणीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात पंधरा दिवसांच्या काळात १८८७ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी दिली.
अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा
जिल्ह्यात १६२७ अंगणवाड्या आहेत. मोहीम राबविताना ग्रामीण भागातील १४२२ तर शहरी भागातील २०५ अंगणवाड्यांतील सेविकांनी गृहभेटी देत मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मोहिमेच्या अंमलबजावणीत अंगणवाडी सेविकांचा सिंहाचाच वाटा राहिला.