राणा दाम्पत्याकडून वारकऱ्यांचे स्वागत

साबुदाणा खिचडीचे वाटप

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
warkaris-welcomed : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाडीचे आयोजन करण्यात आले होते. या रेल्वेगाडीला अकोली स्थानकावरून आमदार रवी राणा व भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी संपूर्ण रेल्वेस्थानक विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.
 
 
k
 
वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी विठ्ठल चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी, समाधान आणि भरभराट नांदो तसेच महाराष्ट्रावर विठ्ठलाची अखंड कृपादृष्टी राहो, अशी प्रार्थना केली. नवनीत राणा यांनी अकोली रेल्वेस्थानकावर उपस्थित वारकऱ्यांना तसेच रेल्वेगाडीतील भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करून त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे वारकऱ्यांनी मनापासून स्वागत करीत समाधान व्यक्त केले.
 
 
स्थानकावर उपस्थित भजन मंडळाने गायिलेल्या विठ्ठलाच्या अभंगांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक सुनील राणा यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदुंगाच्या साथीने भजनाचा आनंद घेत विठ्ठलनामाचा गजर केला.
विशेष रेल्वेगाडी रवाना होताच वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. आ. रवी राणा यांनी लोको पायलट अतुल लोनसने, सहा. पायलट सी. पी. झाडे व मॅनेजर नारायण कराडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, युवा स्वाभिमानचे गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती ॲड. प्रीती बनारसे, नगरसेवक प्रशांत वानखडे, अजय जयस्वाल, दीपक साहू, योगेश विजयकर, स्वीकृत नगरसेवक संजय तिरथकर, संजय हिंगासपुरे, किशोर जाधव, शैलेंद्र कस्तुरे, भाजपा नेते सुनील खराटे आदी उपस्थित होते.