पुणे
Youth dies at Naneghat पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर अखेर मंगळवारी सकाळी बचाव पथकाला युवकाचा मृतदेह दरीत आढळून आला. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि दुर्गम भूप्रदेशामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले होते.मृत युवकाची ओळख दत्ता विनायक लोंढे अशी झाली असून, तो आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे गावचा रहिवासी होता. दत्ता आपल्या तीन मित्रांसह नाणेघाट परिसरात फिरण्यासाठी गेला होता. रविवारी सकाळी परिसरात दाट धुके पसरलेले असताना कड्याजवळ फिरत असताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, मुसळधार पाऊस, निसरडे कडे आणि दाट धुक्यामुळे शोधकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी दत्ताच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. मोबाईलवर रिंग जात असल्याने तो दरीतच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दिशेनेही शोधमोहीम वाढवण्यात आली.सोमवारी अधिकृत बचाव पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शोधकार्याला वेग आला. अखेर मंगळवारी सकाळी दरीत दत्ता लोंढेचा मृतदेह आढळून आला. बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पावसाळ्यात नाणेघाट परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, या काळात दाट धुके, निसरडे कडे आणि खोल दऱ्यांमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फी किंवा साहसी प्रकार करताना विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.