नवी दिल्ली,
10 FIRs registered in Delhi protest नीट पेपरफुटीप्रकरणी सरकारने जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी झुरळ जनता पार्टी (सीजेपी)कडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप आले आहे. गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान सोमवारी, २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांविरोधात ५ पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० एफआयआर दाखल केले आहेत.दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनाशी संबंधित विविध घटना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या उल्लंघनाच्या आरोपांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक एफआयआर मंगळवारी, २१ जुलै रोजी कनॉट प्लेस परिसरात आरएएफच्या जवानावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे.

दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ४ एफआयआर पार्लमेंट मार्ग पोलीस ठाण्यात, ३ एफआयआर सीपी पोलीस ठाण्यात, तर मंदिर मार्ग, बाराखंबा रोड आणि कर्तव्य पथ पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान नवी दिल्लीतील कनॉट प्लेस, पार्लमेंट स्ट्रीट, कर्तव्य पथ, बाराखंबा रोड आणि मंदिर मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.बाराखंबा रोड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेतील अनेक गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा आणणे, सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग, लोकसेवकावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर, बेकायदेशीर जमावात सहभागी होणे आणि अशा जमावाच्या सामूहिक उद्देशातून घडलेल्या गुन्ह्याची जबाबदारी यासंबंधीच्या कलमांचा समावेश आहे.
या प्रकरणात बेकायदेशीर जमावाशी संबंधित कलम १८९(३) आणि १९०, लोकसेवकाला दुखापत किंवा त्याच्या कर्तव्यात अडथळा आणण्याशी संबंधित कलम १२१(१), १२१(२), १३२ आणि १९५(१), तसेच कलम २२१ आणि २२३ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय प्राणघातक किंवा धोकादायक शस्त्रांसह दंगल, दंगल भडकवणे, खुनाचा प्रयत्न आणि सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेच्या नुकसानीशी संबंधित गंभीर कलमांचाही एफआयआरमध्ये समावेश आहे.भारतीय न्याय संहितेच्या कलम १९१(२), १९२, १०९ आणि ३२४(५) अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यातील (पीडीपीपी कायदा) कलम ३ अंतर्गत सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाचीही नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नीट पेपरफुटीप्रकरणी सरकारने जबाबदारी निश्चित करावी, या मागणीवरून सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. मात्र, ‘चलो संसद’ मोर्चानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आंदोलन आणि दिल्ली पोलिसांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.