चिपळूण,
chiplun कोकणातील दापोली तालुक्यातील मळे-सुतारवाडी परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. येथील डोंगराला पडलेल्या २ ते ४ फूट खोल भेगांची तीव्रता पाहता महसूल आणि पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सुतारवाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम आज पूर्ण वेगाने सुरू असून, डोंगराच्या स्थैर्याची तपासणी करण्यासाठी भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याची चिंताजनक घटना समोर आली आहे. प्राथमिक पाहणीनुसार, या भेगा सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या असून काही ठिकाणी त्या दोन ते चार फूट खोल आहेत. सततच्या पावसामुळे या भेगांमध्ये पाणी मुरून संपूर्ण डोंगर खचण्याची आणि मळे गावावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरे आणि नायब तहसीलदार देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाने परिसराचा सविस्तर पंचनामा केला असून संपूर्ण घटनेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने सुतारवाडीतील कुटुंबांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
भूवैज्ञानिक तज्ज्ञांचे पथक डोंगराच्या रचनेची आणि या भेगांच्या स्वरूपाची सखोल वैज्ञानिक तपासणी करणार आहे. हा डोंगर कितपत स्थिर आहे आणि भविष्यात काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा निर्णय या पथकाच्या अहवालानंतरच घेतला जाणार आहे. तोपर्यंत संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.