१२ वर्षांनंतर अजित कडकडे यांचे नवे भक्तिगीत

‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ प्रदर्शित

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
मुंबई
ajit kadkade दत्तभक्तांच्या श्रद्धा आणि भक्तिभावाला साद घालणारे ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे नवे भक्तिगीत नुकतेच ‘सप्तसूर म्युझिक’च्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. “कृतार्थ झाला जन्म पाहुनी सगुण रूप साकार, दत्त दत्त स्मरता तरला ब्रम्हांडाचा भार” या अर्थपूर्ण ओळींमधून दत्तगुरूंच्या कृपेचा आणि त्यांच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनातून लाभणाऱ्या आध्यात्मिक अनुभूतीचा भावपूर्ण आविष्कार या गीतातून साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ वर्षांनंतर ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे यांचे नवे अल्बम सॉंग रसिकांच्या भेटीला आले आहे.
 

ajit kadkade returns with shripad vallabh digambara devotional song after 12 years 
या गीताची निर्मिती ‘सप्तसूर म्युझिक’ने केली असून साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष हे या गीताचे निर्माते आहेत. गीताचे शब्द साई दळवी यांनी लिहिले असून संगीताची धुरा मनोहर गोलांबरे यांनी सांभाळली आहे. संगीत संयोजन निषाद गोलांबरे यांनी केले आहे. तबल्यावर शुभम सुतार आणि पखवाजावर तेजस मोरे यांनी साथ दिली असून मयुरेश, गीता गोलांबरे आणि बीना राजाध्यक्ष यांच्या कोरसने गीताच्या भक्तिरसात अधिक भर घातली आहे.
श्रद्धा, संयम, ज्ञान आणि करुणेचे प्रतीक म्हणून दत्तगुरूंना मानले जाते. त्यांच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनातील संकटे दूर होतात तसेच मनःशांती आणि आत्मिक समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हीच भक्तिभावाची अनुभूती ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या गीतातून प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे.पंडित अजित कडकडे यांच्या भारदस्त, भावस्पर्शी आणि भक्तिरसपूर्ण गायकीमुळे हे गीत अधिक प्रभावी बनले आहे. त्यांच्या आवाजातील भक्तिभाव प्रत्येक श्रोत्याच्या मनाला स्पर्श करत दत्तभक्तीची अनुभूती अधिक गहिरी करतो. दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण संगीतनिर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘सप्तसूर म्युझिक’कडून भक्तिगीते, भावगीते, मराठी गीते आणि विविध संगीतप्रकारांतील कलाकृती सातत्याने रसिकांसमोर सादर केल्या जात आहेत. प्रत्येक निर्मितीत गुणवत्ता, आशय आणि संगीताची समृद्धता जपत श्रोत्यांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निर्माते साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी सांगितले. दत्तभक्तांसह संगीतप्रेमींसाठीही ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे गीत एक आध्यात्मिक आणि संगीतमय पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.