दादा, तुमची उणीव भासतेय… नेत्याला अश्रू अनावर

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
मुंबई
ajit pawar राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शासकीय यंत्रणा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आजही अनेकांच्या मनात कायम असून, जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींनी अनेक नेत्यांना भावूक केले.
 

ajit pawar birth anniversary dhananjay munde gets emotional while paying tribute 
 
 
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती धावपट्टीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्राने या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी त्यांच्या कार्याची आणि आठवणींची उजळणी केली.माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा कंठ दाटून आला असून, हुंदका आवरताना त्यांनी रुमालाने डोळे पुसत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक नेत्यांना भावनांना आवर घालणे कठीण झाले.
धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरही ajit pawar  अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली. “दादा, आपल्या जन्मदिनाला जयंती म्हणावी लागेल, ही कल्पना स्वप्नात सुद्धा येत नाही, तसा विचार अजूनही मनाला शिवत नाही. नियतीने ही वाईट आणि अजब वेळ का आणली असेल, याचं उत्तर शोधतोय. तुम्ही सोबतीला नाहीत, पण तुमची जाणीव आहे सोबतीला. ती जाणीव जनसेवेची आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील. प्रथम जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक आदरांजली दादा,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान, राज्य सरकारने २२ जुलै हा दिवस अधिकृतपणे अजित पवार यांचा जयंती दिन म्हणून घोषित केला आहे. शासकीय कार्यक्रमांच्या यादीत या दिवसाचा समावेश करण्यात आला असून, मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कुटुंबीयांसह राज्यातील प्रमुख नेत्यांनी बारामती येथील स्मृतीस्थळावर तसेच विमान अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले. त्यांच्या कार्याची आठवण काढत अनेकांनी त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली अर्पण केली.