मुंबई
amitabh bachchan बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या ब्लॉगद्वारे स्वतःच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल होण्यापासून ते शस्त्रक्रिया होईपर्यंतचा अनुभव त्यांनी ब्लॉगमध्ये मांडला असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही आरोग्याशी संबंधित काही शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये शस्त्रक्रिया, आयसीयूतील उपचार, रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांचे कौतुक करत उपचारादरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. या लेखनातून ते काही काळ आयसीयूमध्ये दाखल होते, हेही त्यांनी सूचित केले आहे. मात्र, नेमकी कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या आजारामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी हा ब्लॉग सोमवारी रात्री उशिरा लिहिला असून, त्यामध्ये त्यांनी अपयश आणि जीवनातील संघर्ष यावरही तात्त्विक भाष्य केले आहे. ते म्हणतात, "तुम्ही एक उत्तम विजेते असता; मात्र एक दिवस पराभव तुमच्या समोर येऊन उभा राहतो. तो काळ आयुष्यातील सर्वांत कठीण क्षण ठरतो. अशा वेळी काहीजण पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण भूतकाळातील विजयाच्या आठवणींत रमून जातात. काहीजण परिस्थितीचा धैर्याने सामना करतात, तर काहीजण पराभव स्वीकारतात. जे प्रयत्न करत राहतात ते निडर असतात आणि खऱ्या अर्थाने कायमचे विजेते ठरतात. मात्र जे तसे करत नाहीत, ते जुन्या यशाच्या आधारावरच आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. शेवटी या दोन्ही मार्गांपैकी कोणताही चुकीचा नाही. चांगले राहा, आनंदी राहा, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे."
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीविषयीची ही माहिती जाहीर केली असली, तरी त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया करण्यात आली, याबाबत त्यांनी अद्याप मौन बाळगले आहे.सध्या ८३ वर्षांचे असलेले अमिताभ बच्चन आजही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून, ते 'कल्कि 2898 AD'च्या सिक्वेलच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांना विविध आरोग्यविषयक तक्रारी जाणवत असल्या, तरी त्यांनी आपल्या कामाचा वेग कायम राखला आहे.