वॉशिंग्टन/तेहरान,
Attacks on ships in Hormuz अमेरिका आणि इराणमधील थेट लष्करी संघर्ष दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात जवळपास १०० अमेरिकी सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला असून, परिस्थितीवर नियंत्रण न ठेवल्यास संघर्षाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने अर्थात पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलैपासून इराणकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये आणि त्याला प्रत्युत्तर देताना सुमारे १०० अमेरिकी सैनिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या सैनिकांपैकी बहुतांश जणांना डोक्याला दुखापत झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता मध्य पूर्वेतील इतर देशांवरही जाणवू लागला आहे.
दरम्यान, अमेरिकी लष्कराने सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत इराणविरोधातील हवाई हल्ल्यांची दहावी फेरी पूर्ण केली. पेंटागॉनच्या माहितीनुसार, या कारवाईत इराणची लष्करी कमांड केंद्रे आणि नौदलाशी संबंधित क्षमतांना लक्ष्य करण्यात आले.अमेरिकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर इराणच्या दक्षिण भागातही स्फोटांची मालिका झाल्याचे सरकारी माध्यमांनी सांगितले आहे. बंदर अब्बास, केशम आणि होर्मोझगान प्रांतातील बेमानी जिल्ह्यात अनेक शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या राष्ट्रपतींनीही देश एका मोठ्या युद्धात अडकला असल्याचे मान्य केले असून, या संघर्षाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संघर्षाचा सर्वाधिक परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जलवाहतुकीवर झाला आहे. ब्रिटिश मेरिटाइम अथॉरिटीच्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्यानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांना लाईफबोट्सचा आधार घ्यावा लागला. याशिवाय आणखी दोन जहाजांवरही हल्ले झाल्याचे सांगण्यात आले आहे.सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. थेट जलवाहतुकीच्या आकडेवारीनुसार, सोमवारी या महत्त्वाच्या सागरी मार्गातून केवळ ९ व्यापारी जहाजांनी प्रवास केला. त्यामुळे या मार्गावरील आंतरराष्ट्रीय व्यापारावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जखमी सैनिकांची माहिती जाहीर करण्यास विलंब केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष आज पहिल्यांदाच अमेरिकन काँग्रेससमोर हजर होणार आहेत. खासदारांकडून होणाऱ्या कडक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे.