एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
बदलापूर,
badlapur crime संसारात पती-पत्नीमध्ये छोटे-मोठे वाद होणे सामान्य असले तरी काही वेळा हे वाद इतके टोकाला जातात की त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. बदलापूर पूर्व परिसरातील शिरगाव येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका साडीच्या मागणीवरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून, हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
 

badlapur crime wife arrested for allegedly killing husband after dispute over saree 
प्राथमिक माहितीनुसार, शिरगाव परिसरात हरेराम सिंग आणि त्यांची पत्नी सुनीता देवी वास्तव्यास होते. मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला. सुनीता देवी यांनी पतीकडे साडी घेऊन देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी पूर्ण न झाल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद विकोपाला गेल्याचे सांगितले जात आहे.या वादादरम्यान संतापाच्या भरात सुनीता देवी यांनी स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर हरेराम सिंग यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हरेराम सिंग हे शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने ते अंथरुणावरच होते आणि त्यामुळे त्यांना प्रतिकार करता आला नसल्याचे तपासातून समोर आले आहे.घटनेच्या वेळी दाम्पत्याचा सात वर्षांचा मुलगा घरात उपस्थित होता. सुरुवातीला सुनीता देवी यांनी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत घटनेबाबत वेगळी माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांनी मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर घटनेतील अनेक बाबी स्पष्ट झाल्या. मुलाच्या साक्षीमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि आरोपी महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिला अटक करण्यात आली.पोलिसांच्या माहितीनुसार, हरेराम सिंग आणि सुनीता देवी यांच्यात यापूर्वीही वारंवार कौटुंबिक वाद होत होते. त्यामुळे ही घटना केवळ साडीच्या मागणीवरून घडली की त्यामागे दीर्घकाळ सुरू असलेले कौटुंबिक मतभेद, आर्थिक तणाव किंवा इतर काही कारणे होती, याचा तपास केला जात आहे.
तसेच, हत्येच्या वेळी घटनास्थळी आणखी कोणी उपस्थित होते का, या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, आरोपी महिलेने पुरावे नष्ट करण्याचा किंवा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला का, या सर्व बाबींचा तपास बदलापूर पूर्व पोलिसांकडून सुरू आहे.या घटनेमुळे शिरगाव परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वाद इतक्या गंभीर टप्प्यावर पोहोचल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.