बीड,
neet नीट-यूजीच्या २१ जूनला झालेल्या पुनर्परीक्षेत राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ओएमआर शीट आणि अधिकृत उत्तरपत्रिकेवरून गणना केलेल्या ५२२ गुणांऐवजी केवळ ९५ गुण दिले, असा आराेप करत बीड येथील एका विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे़ सोहम नितीन गावटे, असे याचिकाकर्त्याचे नाव आहे़
गावटे यांनी सांगितले की, गुणांमधील तफावतीबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी ईमेल पाठवूनही एनटीएकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे मला न्यायालयात धाव घ्यावी लागली़ औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल केलेल्या या याचिकेवर २३ जुलैला सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने सांगितले की, त्याला १०वी मध्ये ९४.६ टक्के आणि १२वी (विज्ञान) मध्ये ७४.१७ टक्के गुण मिळाले होते़ तो २१ जूनलाझालेल्या नीट-यूजी परीक्षेलाही बसला होता.
मला ५२२ गुण मिळायला हवे हाेते, मिळाले ९५
१४ जुलैला प्रसिद्ध झालेल्या ओएमआर उत्तरपत्रिकेची दोन दिवसांनंतर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत उत्तरसूचीशी तुलना केला असता मी १४८ प्रश्न सोडवले होते़ त्यापैकी १३६ प्रश्न बरोबर आणि १२ प्रश्न चुकीचे होते. नीटच्या गुणदान पद्धतीनुसार मला ७२० पैकी ५२२ गुण मिळायला हवे होते. मात्र, गुणपत्रिकेत केवळ ९५ गुण दाखवण्यात आले, असा दावा गावटे यांनी केला आहे़ यासंदर्भात मी १७ आणि १८ जुलैला एनटीएला ईमेल करून आपल्या निकालाचे पुनर्मूल्यांकन आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली़ परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वकील सुदर्शन साळुंके आणि महेंद्र गांधळे यांच्यामार्फत एक रिट याचिका दाखल केली आहे़ त्यात माझ्या उत्तरपत्रिकेची पडताळणी आणि सुधारित गुणपत्रिकेची मागणी केली आहे.