devendra fadanvis महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राची निरंतर सेवा करीत असलेल्या देवेंद्रजींना त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. शालेय जीवनात अतिशय हुशार आणि कुशाग्र विद्यार्थी म्हणून देवेंद्रजींचा लौकिक होता. विधी महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. लॉ कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली. विद्यापीठ विद्यार्थी संघामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थीदशेत त्यांनी केलेली कामगिरी खरे तर भविष्यातील एका परिपक्व नेतृत्वाच्या जडणघडणीची प्रक्रियाच होती. त्याची प्रचीती साऱ्यांनाच आलेली आहे.
त्यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस जनसंघाच्या काळापासून पक्षाचे कार्यकर्ते होते. मी युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना गंगाधरराव हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी नागपूर शहर, जिल्हा तसेच एकूणच विदर्भातील प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडली. एम्प्रेस मिलच्या कामगारांसाठी गंगाधरराव, ए. बी. बर्धन यांनी केलेल्या आंदोलनांचा मी साक्षीदार आहे. दुर्दैवाने त्यांना असाध्य आजार जडला आणि प्रकृती खालावू लागली. या पृष्ठभूमीवर देवेंद्रने आता राजकारणात यावे, असे आम्हाला वाटले आणि श्रद्धानंद पेठ वॉर्डातून त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मी आणि छोटूभैय्या धाक्रस गंगाधररावांना भेटायला गेलो. सरिता वहिनीही तिथे होत्या. आमचा निर्णय आम्ही दोघांनाही सांगितला. गंगाधररावांनी अतिशय नम्रपणे सांगितले की, देवेंद्रने राजकारणात येण्यास माझी हरकत नाही. पण या गोष्टीचा निर्णय देवेंद्रने स्वतः घ्यावा. त्यांची ही भूमिका आजही मी पक्षाच्या सभा-बैठकांमध्ये मांडत असतो. अलीकडे मुलाला तिकीट मिळावे यासाठी आई-वडील आग्रह धरतात. पण देवेंद्र यांना राजकारणात आणून तिकीट द्यावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही केली नाही. ती पक्षातील आमच्यासारख्या लोकांनी केली होती. हा आदर्श आज प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवायला हवा.
महापालिकेच्या निवडणुकीत देवेंद्रजी निवडून आले. त्या काळात जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळाली. नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या भाजपच्या अधिवेशनाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्रजींवर सोपवण्यात आली होती. देशभरातील कार्यकर्ते याठिकाणी आले होते. उत्तम आयोजनातून देवेंद्रजींनी सर्वांचे मन जिंकले. त्यावेळी मी गंगाधररावांच्या जागेवर पदवीधर मतदारसंघाचा आमदार झालो होतो. पुढे देवेंद्रजींनी पश्चिम नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. मात्र, त्यांचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता. अनेक आव्हाने होती. पुढच्या निवडणुकीत आम्ही सर्वेक्षण केले तेव्हा दक्षिण आणि पश्चिम नागपूरमधून उमेदवार जिंकणे अवघड असल्याचे लक्षात आले. मी देवेंद्रजींच्या कानावर टाकले. त्यांनी देशपांडे सभागृहात पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांचे संमेलन घेतले. जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आणि निवडणूक जिंकले. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात तरुण व उत्तम संसदपटू म्हणून स्वतःची छाप पाडली. विदर्भ, मराठवाड्याच्या मागासलेपणाचा प्रश्न असो की भ्रष्टाचाराची प्रकरणे असो, देवेंद्रजी आक्रमकपणे मुद्दे मांडत.
त्यावेळी विधानसभेत नारायण राणे तर परिषदेत मी विरोधी पक्षनेता होतो. राणे, मुंडे यांनी देवेंद्रजींना सातत्याने प्रोत्साहन दिले. विषय उपस्थित करून चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी देवेंद्रजींवर सोपवण्यात येत असे. संसदीय कर्तृत्व आणि वक्तृत्वाने त्यांनी सभागृह अक्षरशः गाजवले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी राज्याला समृद्ध, संपन्न केले. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या. मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक आणली. मी केंद्रात जलसंपदा खाते सांभाळत असताना देवेंद्रजींनी विदर्भातील बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पांना पुनर्जीवन देण्यासाठी पुढाकार घेतला. गोसेखुर्दसारखे प्रकल्प मार्गी लावले. केवळ विदर्भातील नव्हे तर सोलापूर, सांगली, सातारा येथील योजना देखील पूर्ण केल्या.devendra fadanvis सिंचनाचा मोठा अनुशेष दूर झाला. देवेंद्र यांनी ज्या समस्यांसाठी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते, मुख्यमंत्री झाल्यावर त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या विकासात देवेंद्रजींचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यात नवे प्रकल्प आणण्यासाठी, उद्योगांत गुंतवणूक वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आणि आजही सुरू आहे. समृद्धी महामार्गाच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय देवेंद्रजींचे आहे. नक्षल चळवळीमुळे गडचिरोलीचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण वाढले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच साडेसात लाख कोटींची गुंतवणूक गडचिरोलीत आली आणि नक्षल समस्येवर नियंत्रण आले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई-नागपूर असा भेद न करता संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी चौफेर विकास केला. कर्करोगामुळे वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी नागपुरात भव्य असे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट त्यांनी उभे केले. यातून देवेंद्र यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते.
मनमिळावू, नम्र, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून देवेंद्रकडे बघितले जाते. त्याचवेळी प्रशासनाच्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेऊन केवळ महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यासारखा धडपड्या, कर्तबगार आणि निष्ठावान नेता हा महाराष्ट्रासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांचे भविष्यातील राजकीय आणि सामाजिक योगदान आणखी समृद्ध होवो, हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा.
नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार