भारतीय फार्मावर ट्रम्प यांचा ‘करबॉम्ब’!

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
donald-trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून येणाऱ्या सर्वसाधारण औषधांच्या (जेनेरिक औषधे) आयतीबाबत एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या औषधांवर पुढील दोन वर्षे कोणताही आयात कर आकारला जाणार नाही, मात्र ऑगस्ट २०२८ पासून १०० टक्के आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने तब्बल २०० टक्क्यांपर्यंत आयात कर (टॅरिफ) लादला जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
 
 

trump
 
 
 
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे भारतातील औषध उत्पादक कंपन्यांची चिंता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, कारण भारत हा अमेरिकेला औषधांचा पुरवठा करणारा सर्वांत मोठा देश आहे.
 
नवीन नियमावली काय आहे?
 
१ ऑगस्ट २०२६ पासून पुढील दोन वर्षांपर्यंत आयात औषधांवर शून्य कर राहील. मात्र, ऑगस्ट २०२८ पासून एका वर्षासाठी १०० टक्के आणि त्यानंतर हा कर वाढवून २०० टक्के केला जाईल. ज्या औषध कंपन्या अमेरिकेत स्वतःचे उत्पादन प्रकल्प उभारणार नाहीत, त्यांना या प्रचंड कराचा फटका सहन करावा लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
 
भारतावर काय परिणाम होणार?
 
भारताला जागतिक स्तरावर 'औषधांचे घर' मानले जाते. भारतीय कंपन्या अमेरिकेसह अनेक देशांना अत्यंत माफक दरात औषधे पुरवतात. वर्ष २०२५ मध्ये भारताने अमेरिकेला ९.७ अब्ज डॉलर मूल्याच्या औषधांची निर्यात केली होती, जी भारताच्या एकूण औषध निर्यातीच्या सुमारे ३८ टक्के होती. अशा परिस्थितीत नवीन कर लागू झाल्यास भारतीय औषध कंपन्यांचा उत्पादन खर्च आणि व्यवसाय या दोन्हीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
 
अमेरिकेतही विरोधाचा सूर
 
या निर्णयावर अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. बाहेरून येणाऱ्या औषधांवर मोठा कर लादल्यामुळे अमेरिकेत औषधे अत्यंत महाग होतील, रुग्णांवर आर्थिक बोजा वाढेल आणि अनेक महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या एकूण औषधांपैकी ९० टक्के औषधे ही याच प्रकारची असतात आणि त्यात भारतीय बनावटीच्या औषधांचा वाटा सर्वांत मोठा आहे.
 
सध्या भारतीय औषध उद्योग या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असून, पुढील दोन वर्षांनंतर अमेरिकेच्या बाजारात व्यापार करण्यासाठी भारतीय कंपन्यांना आपल्या रणनीतीत मोठे बदल करावे लागतील.