जिथे काळाने दादा हिरावले तेथेच जमले पवार कुटुंब!

सुनेत्रा पवारांच्या अश्रूंनी वातावरण भावूक

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |

बारामती,
emotional with Sunetra Pawar's राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांनी गोजुबावी येथील अपघातस्थळी जाऊन भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. अजित पवार यांचे चार्टर्ड विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले होते, त्या धावपट्टीजवळ पवार कुटुंबीय पोहोचले. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील आणि विजया पाटील उपस्थित होते. कुटुंबीयांनी अजित पवार यांच्या स्मृतींना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी परिसरात अत्यंत भावूक वातावरण निर्माण झाले होते. अजित पवार यांच्या आठवणींनी सुनेत्रा पवारही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
 
fg687
अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी मंगळवारी मध्यरात्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना २८ जानेवारी रोजी त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावाच्या हद्दीत त्यांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळले. दुर्घटनेनंतर झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता.
या विमान दुर्घटनेनंतर घातपाताची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंतच्या तपासात त्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी भावनिक भावना व्यक्त केल्या. यापूर्वी अजितदादांचा जन्मदिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात होता. मात्र, आज तोच दिवस ‘जयंती’ म्हणून साजरा करताना मनाला मोठी वेदना होत असल्याचे त्यांनी म्हटले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अजित पवार यांनी आपल्याला भक्कम आधार दिला. कठीण प्रसंगात त्यांची साथ, विश्वास आणि प्रेम हीच आपली मोठी ताकद होती. मात्र, काळाने हा आधार अचानक हिरावून घेतल्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. अजित पवार आज शारीरिकदृष्ट्या सोबत नसले तरी त्यांचे विचार, आठवणी, लोकसेवेची भावना, शिस्त आणि त्यांनी दिलेले प्रेम कायम आपल्या आयुष्यात जिवंत राहील, अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या स्मृतींना त्यांनी भावपूर्ण आणि आदरपूर्वक अभिवादन केले.