कमल छांगाणी,
धामणगाव रेल्वे,
gold-ring-lost : शेतात हरवलेली १ तोळे सोन्याची अंगठी तब्बल ८ वर्षानंतर परत मिळेल याबाबत साधीशी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. परंतु, हे घडले आहे धामणगाव तालुक्यातील (ता. अमरावती) कामनापूर घुसळी येथे!
कामनापूर घुसळी येथील शेतकरी अरुणकुमार पनपालिया यांचे घुसळी शिवारात शेत आहे. ८ वर्षांपूर्वी पनपालिया शेतात असताना अचानक त्यांच्या बोटातील एक तोळ्याची अंगठी पडली. ही गोष्ट पनपालिया यांच्या लक्षात येताच त्यांनी खूप शोधाशोध केली. परंतु, त्यावेळीच शेतात नांगरणी झाल्याने दिवसभराची मेहनत करूनही अंगठी मिळाली नाही. अनेक दिवसापर्यंत शोध घेतला. परंतु, तो व्यर्थ गेला म्हणून पनपालिया यांनी शोधमोहीम बंद केली. यावर्षी पेरणीची तयारी झाली. काम करणारा मजूर विजय निमुर्ते हा नांगर घेऊन शेतात पोहचला. तो काही दूरपर्यंत त्याने नांगरणी केली असता अचानकपणे त्याला काळ्या मातीत सोने चमकले. तेव्हा शेतात तो एकटाच होता. ८ वर्षांपूर्वी मालकाची अंगठी हरविली होती याची माहिती त्याला होती.
मजुराचा प्रामाणिकपणा
मजुरी काम करणारा अत्यंत गरीब असलेला विजय निमुर्ते याने अंगठी दिसताच मालक अरुणकुमार पनपालिया यांना कळविले आणि ती त्यांना परत केली. सापडलेल्या सोन्याच्या अंगठी सोबतच विजय निमुर्ते यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा होत आहे.