गोंदिया जिल्ह्यात ‘पाऊस’ सर्वदुर!

- देवरी, अर्जुनी-मोर, सडक-अर्जुनीत अतिवृष्टी, इतर भागात पावसाची रिमरिम

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
gondia-rain : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या असताना काही भागात रिमरिम पावसाची आनंद नागरिकांनी घेतला. बुधवार 22 जुलै रोजी सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील देवरी, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात 87.8 मिमी., देवरी 74.2 मिमी, आणि सडक-अर्जुनी तालुक्यात 76.5 मिमी पावसाची नोद करण्यात आली आहे.
 
 
 
gondia-rain
 
 
 
8 जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. पावसाअभावी धानरोपवाटिका करपण्याच्या मार्गावर आल्या होत्या. शेतकरी चिंतेत असतानाच वरुणराजाने पुन्हा जोरदार हजेरी लावत सलग तीन दिवस पावसाची रिपरिप कायम होती. दरम्यान, याच कालावधीत जिल्ह्यातील सडक अर्जुनी, देवरी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात 420.8 मिमी पावसाची नोंद झाली असून, ती जुलैच्या सरासरीच्या 142.9 टक्के आहे. तर गत 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 47 मिमी पाऊस झाला. तालुकानिहाय आकडेवारीनुसार बुधवारी सकाळी 10 वाजताच्या घेण्यात आलेल्या नोंदप्रमाणे गोंदिया तालुक्यात 20.3 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आमगाव तालुक्यात 17.9 मिमी., तिरोडा 39.4 मिमी., गोरेगाव 26.8 मिमी., सालेकसा 33.7 मिमी., तर गेल्या 24 तासातच देवरी तालुक्यात 74.2 मिमी., अर्जुनी मोरगाव 87.8 मिमी. व सडक अर्जुनी तालुक्यात 76.5 मिमी. पाऊस झाला असून या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
 
 
नागपूर विभागात गोंदियात समाधानकारक...
 
नागपूर विभागात जूनपासून आतापर्यंत सरासरी 73.5 टक्के पाऊस झाला असून, त्या तुलनेत गोंदिया जिल्ह्याची कामगिरी अधिक समाधानकारक असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
 
धान लागवडीला वेग...
 
 
कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरत असून धान लागवडीच्या कामांना वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 30 टक्के धान लागवड पूर्ण झाली असून, आगामी काही दिवस पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.