हशमतुल्ला शाहिदीने सोडले अफगाणिस्तानचे कर्णधारपद

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
काबूल,
Hashmatullah Shahidi resigns as captain भारतीय संघाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने राष्ट्रीय संघाच्या एकदिवसीय कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानची शेवटची मालिका भारताविरुद्ध झाली.२०२२मध्ये अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या शाहिदीने आपल्या नेतृत्वाखाली संघाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळवले. त्याच्या कर्णधारपदाच्या काळात अफगाणिस्तानने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक, आशिया कप आणि २०२५ चॅम्पियन्स लीगमध्ये सहभाग घेतला. त्याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने ५५ एकदिवसीय सामन्यांपैकी २७ सामने जिंकले.
 
 

et54657 
 
२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने प्रभावी कामगिरी केली होती. या स्पर्धेत इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघांना अफगाणिस्तानने पराभूत केले. उपांत्य फेरीच्या शर्यतीत संघाने जोरदार आव्हान उभे केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमांचक सामन्यात पराभव झाल्याने त्यांचे पुढील आव्हान संपुष्टात आले.शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने द्विपक्षीय मालिकांमध्येही चांगली कामगिरी नोंदवली. बांगलादेशला तीन वेळा आणि झिम्बाब्वेला दोन वेळा पराभूत करण्यात संघाला यश आले. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धही अफगाणिस्तानने प्रत्येकी एक विजय मिळवला.
 
 
कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शाहिदीच्या वैयक्तिक फलंदाजीतही सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. कर्णधार होण्यापूर्वी त्याची फलंदाजीची सरासरी ३२.९७ आणि स्ट्राइक रेट ६४.३९ होता. कर्णधार झाल्यानंतर त्याची सरासरी ३३.७९, तर स्ट्राइक रेट ७०.७७ झाला. भारताविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शाहिदीने आपल्या कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्याने १३१ चेंडूंमध्ये १०२ धावांची खेळी केली.अफगाणिस्तानकडून आतापर्यंत शाहिदीने १२ कसोटी, ९६ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे ७९६, २६०७ आणि ४८ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २ शतके आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १ शतक आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत. अफगाणिस्तानची पुढील एकदिवसीय मालिका ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध होणार आहे. मात्र, हशमतुल्ला शाहिदीनंतर संघाच्या नव्या कर्णधाराची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.