आसाममध्ये पुराचा हाहाकार; २४ तासांत २१ मृत्यू

५.६४ लाख नागरिक बाधित

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
गुवाहाटी,
Havoc caused by floods in Assam आसाममध्ये पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, गेल्या २४ तासांत पुरामुळे आणखी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील पुरामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३१ वर पोहोचली आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांमधील ५ लाख ६४ हजार ६०० हून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) जारी केलेल्या अहवालातून राज्यातील पूरस्थितीची गंभीरता समोर आली आहे. शिवसागर जिल्ह्यात परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असून, तेथे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत राज्यातील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ पाच होती. मात्र, गेल्या २४ तासांत मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
 
 
 
Havoc caused by floods in Assam
 
गोलाघाट, कामरूप, होजई, दिब्रुगड, बिस्वनाथ, धेमाजी, सोनितपूर, उदलगुरी, नागाव, चराईदेव, कामरूप (मेट्रो), जोरहाट, तिनसुकिया, कार्बी आंगलोंग आणि सिखवसाखवा या १६ जिल्ह्यांमध्ये पुराचा मोठा परिणाम झाला आहे. या जिल्ह्यांतील ४४ महसूल विभागांमधील ८७२ गावे पाण्याखाली गेली आहेत.शिवसागर जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार ५३५ नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. त्यानंतर जोरहाटमध्ये ८७ हजार ६६२ आणि चराईदेवमध्ये ७२ हजार ६४६ नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी राज्यात ७१ मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १२ हजार २८४ जणांनी आश्रय घेतला आहे. याशिवाय २०२ मदत वितरण केंद्रांमधून नागरिकांना आवश्यक साहित्य पुरवले जात आहे.
 
 
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदत व बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारपासून पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्याची माहिती दिली आहे. प्रशासनाकडून प्रभावित भागातील नागरिकांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पूरस्थितीत नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुराच्या काळात बुडण्याबरोबरच विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढतो. तसेच घरातील वस्तू, जनावरे आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. पूरस्थितीचा इशारा मिळताच नागरिकांनी पाणी, सुका खाद्यपदार्थ, टॉर्च, बॅटरी, मोबाईल चार्जर, प्रथमोपचाराचे साहित्य, आवश्यक औषधे, पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली आपत्कालीन किट तयार ठेवावी. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी पाणी वाढण्यापूर्वी सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करावे.