भारत-झिम्बाब्वे पहिला टी-२० सामना आज; सामना कुठे आणि किती वाजता?

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
हरारे,
India vs Zimbabwe T20 match श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. गेल्या महिन्याभरात भारतीय संघाची ही तिसरी टी-२० मालिका असून, आतापर्यंतच्या मालिकांमध्ये संघाला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयाचे खाते उघडण्याच्या प्रयत्नात असेल.भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे, यजमान झिम्बाब्वेच्या संघात कर्णधार सिकंदर रझासह अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यापूर्वी सिकंदर रझाने भारतीय संघाला कमी लेखू नये, असा इशारा दिला आहे. ही मालिका एकतर्फी होणार नसून दोन्ही संघांकडे विजयाची समान संधी असल्याचे त्याने म्हटले आहे.
 
 
India vs Zimbabwe T20 match
 
भारतीय संघाचे कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासमोरही मोठे आव्हान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दोन टी-२० मालिका आणि एकूण सहा सामने गमावले आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा दबाव भारतीय संघावर असेल.भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला टी-२० सामना गुरुवार, २३ जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना दुपारी ४:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी ४ वाजता होणार आहे.
 
 
या सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण युनिट८ स्पोर्ट्स टीव्हीवर करण्यात येणार आहे. सामन्याचे थेट ऑनलाइन प्रक्षेपण फॅनकोडच्या ॲप आणि संकेतस्थळावर उपलब्ध असेल. भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असून, तिलक वर्मा उपकर्णधार आहे. संघात यष्टीरक्षक ईशान किशन आणि प्रभसिमरन सिंग यांच्यासह वैभव सूर्यवंशी, रिंकू सिंग, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, मयंक यादव, अशोक शर्मा आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे.