मुंबई
katkon trikon मराठी रंगभूमीवर आशयप्रधान नाटकांची परंपरा समृद्ध करणाऱ्या कलाकृतींच्या मालिकेत आता आणखी एका वेगळ्या नाटकाची भर पडणार आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक येत्या ऑगस्टमध्ये रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याच्या पोस्टरनेच रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ‘बुद्धी आणि भावना ह्यांना स्पर्श करणारं नाटक!’ या एका ओळीतील ओळखीमुळे या नाटकाच्या कथावस्तूबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
सर्वसामान्य वाटणाऱ्या एका कुटुंबाच्या आयुष्यात घडणारी एक घटना आणि त्यानंतर बदलत जाणारी नात्यांची समीकरणे, प्रत्येक उत्तरातून उभे राहणारे नवे प्रश्न, मनात दडवून ठेवलेली सत्ये आणि भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली माणसे याभोवती या नाटकाची कथा गुंफण्यात आली आहे. ‘काटकोन त्रिकोण’ नेमके काय उलगडणार, याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहील, असा दावा निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर या तीन दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधांतील विविध छटा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.
या नाटकाविषयी बोलताना दिग्दर्शक अजित भुरे म्हणाले, “‘काटकोन त्रिकोण’ हा एक कौटुंबिक थ्रिलर आहे. प्रत्येक कुटुंबात काही न बोललेले प्रश्न, काही दडवलेली सत्ये आणि काळानुसार बदलत जाणारी नाती असतात. त्या बदलांचा वेध हे नाटक घेते. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतानाच ते त्यांना स्वतःच्या नातेसंबंधांकडे नव्या दृष्टीने पाहण्यास भाग पाडेल. कथानकातील रहस्य जपणे आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक प्रसंगानंतर ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हावा, अशा पद्धतीने या नाटकाची रचना करण्यात आली आहे.”
‘काटकोन त्रिकोण’चे लेखन विवेक बेळे यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा अजित भुरे यांनी सांभाळली आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची, तर संगीत साई पियुष यांचे आहे. नितीन नाईक हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. चौरंगी एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर सादर होणार असून, त्याबाबत रंगभूमीप्रेमींमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.