अनिल कांबळे,
नागपूर,
kidnapping-of-schoolboy : शाळेच्या बसची वाट बघत असलेल्या आई व मुलाजवळ एक ऑटोचालक आला. त्याने स्कूलबस येणार नसल्याचे सांगून शाळेने मलाच मुलांना शाळेत आणण्यासाठी पाठविल्याचे सांगितले. महिलेने मुलाला ऑटोत बसविले आणि काही क्षणातच तिला संशय आला. महिलेने दामिनी पथकाला माहिती दिली. महिला पोलिस पोहचताच तो ऑटोचालक पळून गेला. मात्र, दामिनी पथकाने आटोचालकाचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. महिलेची सतर्कता आणि दामिनी पथकाच्या तत्परतेमुळे मुलाच्या अपहरणाचा डाव फसला. महिला पोलिसांच्या या कार्याचे कौतूक सर्वत्र होत आहे.

मनिषनगरातील चौकात एक महिला आपल्या १४ वर्षीय मुलासह शाळेच्या बसची वाट बघत होती. स्कूलबसला वेळ असल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला मुलाशी गप्पा करीत असतानाच एक ऑटोचालक तेथे आला. ‘स्कूलबस येणार नाही, त्यामुळे शाळा प्रशासनाने मलाच मुलांना शाळेत आणण्यासाठी पाठवले आहे.’ असे सांगितले. महिलाचा विश्वास बसला आणि तिने ऑटोत मुलाला बसवले. मात्र, काही क्षणातच महिलेला ऑटोचालकावर संशय आला. तिने ऑटोचालकाला थांबवले आणि शाळेच्या मुख्याध्यापिकेला फोन करुन स्कूलबस आणि ऑटोचालकाबाबत विचारणा केली. मुख्याध्यापिकेने नकार देताच महिलेची भंबेरी उडाली. तिने लगेच शाळेच्या वॉट्सअप ग्रूपमध्ये असलेल्या दामिनी पथकाचा नंबर घेतला आणि कॉल केला. सात मिनिटांच्या आत दामिनी पथकाचे वाहन तेथे पोहचले. मात्र, तो ऑटोचालक तेथून पळून गेला.
अखेर घेतला ऑटोचालक शोध
ही घटना घडताच दामिनी पथकाने भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा मते यांना माहिती दिली. त्यांनी घटनेची गांभीर्य ओळखता ऑटोचालकाचा शोध घेण्यास सांगितले. पोलिस हवालदार रीना जाऊरकर, रेखा कावडकर, अंमलदार सुजाता पाटील आणि दामिनी वाहन चालक महिला पोलिस अंमलदार सोनाली उके यांनी लगेच ऑटोचालकाचा शोध सुरु केला. काही तासांतच त्या ऑटोचालकाचा शोध घेतला आणि प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात दिला.
ऑटोचालकाला शिकवला धडा
प्रतापनगरचे ठाणेदार पंकज बोंडसे यांनी ऑटोचालकाची चौकशी केली. त्याने सुरुवातील उडवाउडवीचे उत्तरे दिली. या घटनेची स्टेशन डायरीवर नोंद घेण्यात आली. मुख्याध्यापिकेशी चर्चा करण्यात आली. तो ऑटोचालक पूर्वी त्याच शाळेतील स्कूलबसवर चालक असल्याची माहिती समोर आली. शाळकरी मुलाच्या आईचे समूपदेशन केले. पोलिसांनी ऑटाचालकाला चांगला धडा शिकवला. मात्र, घटनेत दामिनी पथकाने महत्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे पथकाचे सर्वत्र कौतूक होत आहे.