मुंबई
koparkhairane navi mumbai crime नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-१९ परिसरात रात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका मेडिकलजवळील शिवसेना शाखेसमोर दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही, तर मुलाचा वाद मिटवण्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या आईवरही हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्रे घेऊन दहशत निर्माण केल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोपरखैरणे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे गावातील सेक्टर-१९ परिसरात काही तरुण नियमितपणे योगिता मेडिकलजवळील एका घरासमोर बसत होते. याबाबत एका स्थानिक महिलेने त्यांना विरोध केला होता. या कारणावरून आरोपींनी संताप व्यक्त करत संबंधित तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्यादरम्यान तरुणाची आई वाद शांत करण्यासाठी पुढे आली. मात्र, आरोपींनी तिचे म्हणणे न ऐकता तिच्यावरही हल्ला केला. या घटनेत तरुणासह त्याच्या आईलाही दुखापत झाली असून, दोघांवर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये आरोपींकडे तलवार आणि चॉपरसारखी धारदार शस्त्रे स्पष्टपणे दिसत आहेत. या शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रांचा वापर झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार koparkhairane navi mumbai crime आरोपी अमली पदार्थ किंवा मद्याच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दिशेनेही पोलिसांकडून तपास सुरू असून, आरोपींची पार्श्वभूमी, त्यांचे गुन्हेगारी संबंध आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.घटनेनंतर कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी वाढती गुन्हेगारी, खुलेआम फिरणारी धारदार शस्त्रे आणि अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. परिसरात पोलीस गस्त वाढवावी, समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि अवैध नशेच्या व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची चौकशी सुरू केली असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.