गोंदिया,
goregaon-police : कायद्याची अंमलबजावणी करणारी खाकी केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत नाही, तर सामाजिक जबाबदारीही तेवढ्याच संवेदनशीलतेने पार पाडते, याची प्रचिती गोरेगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी दिली. नाकाबंदीदरम्यान गोरेगाव-ठाणा मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतःच्या पुढाकारातून ते खड्डे बुजवून अपघात टाळण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत होत आहे.

गोरेगाव-ठाणा मार्गावरील पांगोली नदी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या मार्गावर अनेक अपघात घडले असून काहींना जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. अशातच गोरेगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक हिना मुल्ला, सहाय्यक फौजदार मुनेश्वर राऊत, पोलिस हवालदार श्रीकांत धारगावे व पोलिस शिपाई लिलाधर चुटे हे पांगोली नदी परिसरात नाकाबंदी करीत असताना वाहनचालकांना खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय व अपघाताचा धोका त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून जेसीबीच्या साहाय्याने मार्गावरील खड्डे बुजविण्याची व्यवस्था केली. या उपक्रमामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या या लोकाभिमुख व संवेदनशील भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आता तरी याकडे लक्ष द्यावे व या मार्गाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.