मुंबई
maharashtra rain alert मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मुंबईसह उपनगर, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईत काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून, भारतीय हवामान विभागाने आज २२ जुलै २०२६ रोजी शहरासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रोहतक, सिधी, रांची ते दिघा आणि वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सुमारे १.५ किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि सातारा घाटमाथा तसेच कोल्हापूर परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक आणि विदर्भातील काही भागांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या भागांत वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कडवा, भावली आणि पालखेड धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे.
कडवा धरणातून ३७४ क्युसेक,maharashtra rain alert भावली धरणातून १ हजार २१८ क्युसेक, तर पालखेड धरणातून १ हजार ३९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत कालपासून पावसाची संततधार कायम असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.राज्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत रिमझिम पावसाची संततधार सुरू असून, पहाटेपर्यंतही पावसाची रिपरिप कायम होती. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळाला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांसारख्या पिकांबाबत शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता झालेल्या पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होणार असून, खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.