तभा वृत्तसेवा
पारवा,
parva-bus-station : सोमवारी झालेल्या पावसामुळे पारवा बस स्थानकाची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. बस स्थानकाच्या अगदी मुख्य गेट समोरच मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
मंगळवारी दुपारी दोन प्रवाशाला पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज आला नाही. मुख्य गेट मधून आत येत असताना ते दोघेही खड्ड्यात पडता पडता थोडक्यात वाचले. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य गेट समोरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाले असून, आलेल्या पावसाने तिथे पाण्याचे मोठे डबके तयार केले आहे.
यामुळे प्रवाशांना आत जाणे पूर्णपणे कठीण झाले आहे. एसटी चालकांनाही खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची दाट भीती निर्माण झाली आहे. एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मुख्य गेट समोरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.