जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर पवार-मोदींची खास भेट!

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
meeting between Pawar and Modi दिल्लीतील जंतर मंतरवर नीट-यूजी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, २२ जुलै रोजी राजधानीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने या भेटीचे राजकीय महत्त्व वाढले आहे. पवार यांनी यापूर्वी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती आणि आंदोलनाला पाठिंबा दिला होता. विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि त्यांच्या मागण्यांबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली होती.
 
 

meeting between Pawar and Modi 
 
या भेटीचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, पवार-मोदी भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) समावेश होणार असल्याच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांमध्ये पवारांच्या पक्षाला स्थान मिळणार असल्याच्या राजकीय चर्चांमुळे या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र, या भेटीत एनडीए किंवा अन्य कोणत्याही राजकीय निर्णयाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.शरद पवार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीची आपल्याला सविस्तर माहिती नसल्याचे सांगत, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार पंतप्रधानांना भेटले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
शरद पवार यांनी मंगळवारी जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस केली तसेच त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. त्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीमुळे विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली असावी, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले. सध्या या भेटीमागील नेमका अजेंडा अधिकृतपणे समोर आलेला नसल्याने राजकीय चर्चांना मात्र वेग आला आहे.