मुंबई
mumbai water crisis मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत असून, मंगळवार २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून बुधवार २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे जलाशयांमधील एकूण साठा ६१.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत तलावांच्या पाणीसाठ्यात तब्बल ४.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, तलावांमध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत आहे. पाणीसाठा वाढण्याचा हा वेग कायम राहिल्यास मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात लवकरच मागे घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई पालिकेच्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख दोन तलाव विहार आणि तुळशी हे जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले असून ओसंडून वाहत आहेत. १८ जुलै २०२६ रोजी सात तलावांमध्ये ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. त्यानंतर २० जुलै २०२६ रोजी हा साठा वाढून ७ लाख ८२ हजार ३७० दशलक्ष लिटर झाला. आता २२ जुलै २०२६ पर्यंत एकूण पाणीसाठा ८ लाख ३५ हजार ९१९ दशलक्ष लिटरवर पोहोचला असून, हा साठा एकूण साठवण क्षमतेच्या ५७.७५ टक्के इतका आहे.तुळशी आणि विहार हे दोन्ही तलाव १०० टक्के क्षमतेने भरले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास इतर तलावांमधील पाणीसाठाही वेगाने वाढण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात मुंबईसह पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून, जुलै महिना संपत असतानाही पावसाचा जोर कायम असल्याने जलाशये भरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मुंबईतील पाणी शुद्धीकरण केंद्र असलेल्या भांडुप संकुल परिसरात गेल्या २४ तासांत ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान २००६ मिलीमीटरवर पोहोचले आहे. हवामान विभागाने आगामी काही दिवसांतही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याची स्थिती पाहता, अप्पर वैतरणा तलावात ७२ हजार २०९ दशलक्ष लिटर म्हणजेच ३६.४१ टक्के, मोडक सागरमध्ये १ लाख २ हजार दशलक्ष लिटर म्हणजेच ८३.१८ टक्के, तानसा तलावात १ लाख २२ हजार ४०४ दशलक्ष लिटर म्हणजेच ९३.२२ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९० हजार ५२८ दशलक्ष लिटर म्हणजेच ५०.२१ टक्के, भातसा तलावात ३ लाख ३५ हजार ४९५ दशलक्ष लिटर म्हणजेच ५७.१७ टक्के पाणीसाठा आहे. तर विहार आणि तुळशी तलाव प्रत्येकी १०० टक्के भरले आहेत.
पाणीसाठ्यात होत असलेली ही वाढ मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी असून, आगामी काळात पाणीकपातीबाबत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.