विचित्र अपघातात महापालिकेचा कर्मचारी ठार : तिघे जखमी

बस-मेटेडोरमध्ये झाला अपघात

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर

nagpur accident शहरातील अंबाझरी मार्गावरील एलईडी चौकात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दूध वाहतूक करणाऱ्या मेटाडोरमध्ये झालेल्या अपघात वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वृद्धाच्या अंगावर आदळले. या अपघातात नागपूर महानगरपालिकेचे (मनपा) सेवानिवृत्त कर्मचारी सुनील आनंदराव जाधव (वय ६५, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, अंबाझरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 

nagpur accident: municipal retired employee killed as st bus and milk metador collide at ambazari 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता अमोल दूध संकलन करणारे वाहन मेटाडोर (एमएच-३१-जीडी-०५८५) रामनगरकडून अभ्यंकरनगर चौकाच्या दिशेने जात होते. त्याच वेळी शंकरनगर चौकाकडून अंबाझरी टी-पॉइंटच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस (एमएच-४०-वाई-५१२७) ची एलईडी चौकात मेटाडोरला जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दूध वाहतूक करणारी मेटाडोर नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर आदळले. या अपघातात सुनील आनंदराव जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुनील खुशालराव गुडधे (६२, रा. गांधीनगर, अंबाझरी), शैलेंद्र मारोतराव किनगावकर (६२, रा. कॉर्पोरेशन कॉलनी) आणि मेटाडोर चालक अभिषेक दुर्गाप्रसाद जगणे (२३, रा. खापरखेडा, कोराडी रोड) हे तिघे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काही काळ वाहतूक ठप्प
अपघाताची माहिती मिळताच बजाजनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतनसिंह चव्हाण सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनीही तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यास मदत केली. पोलिस आणि आपत्कालीन सेवांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात हलवले.अपघातामुळे एलईडी चौक आणि अंबाझरी मार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात एसटी बस आणि मेटाडोरची धडक झाल्यानंतर मेटाडोर चालकाचे नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे.