दाम्पत्याने केली बँकेची १५ लाखांची फसवणूक

कर्जासाठी केला बनावट कागदपत्रांचा वापर

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
fake documents  बनावट कागदपत्रे तयार करून बँकेकडून गृहकर्ज उचलत सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर संबंधित पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे या कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रिती दारवेकर आणि राजू दारवेकर अशी आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.
 
 
 
 

fake documents
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्य प्रिती आणि राजू यांनी एका मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवत बँक ऑफ बरोडा या बँकेत सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी गृहकर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर त्याच मालमत्तेच्या आधारे इतर आर्थिक व्यवहारही केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजू आणि प्रिती यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बॅक, पारडी शाखा, अरविंद सहकारी बॅक, डीगडोह आणि युसीडी बॅक, सोमलवाडा या बँकेतूनही कर्जाची उचल केली. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर बँकेने मालमत्तेची पडताळणी केली असता सादर करण्यात आलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचे समोर आले. पुढील चौकशीत कागदपत्रांमध्ये फेरफार करून बँकेची दिशाभूल करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बँकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, या प्रकारामुळे बँकेला सुमारे १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिसांनी प्रकरणातील कागदपत्रे जप्त केली असून संबंधित व्यवहार, मालमत्तेची नोंदणी, कर्ज मंजुरीची प्रक्रिया आणि आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. तसेच या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे. या घटनेनंतर बँकांकडून कर्ज मंजुरीपूर्वी मालमत्तेची सखोल पडताळणी करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली असून नागरिकांनीही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रांची कायदेशीर शहानिशा करूनच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे