मुंबई
nalasopara police नालासोपारा येथून अंमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई समोर आली आहे. तुळींज पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३ कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले असून, या प्रकरणात एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. मात्र, तिचा एक साथीदार पोलिसांच्या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव परिसरातील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये ही कारवाई करण्यात आली. एका नायजेरियन महिलेकडून अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर तुळींज पोलिसांनी तातडीने कारवाई करत मंगळवारी सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांचे पथक वैष्णवी अपार्टमेंटमध्ये पोहोचताच तेथे उपस्थित असलेला महिलेचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतल्यानंतर तिच्याकडे मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ हजार ६२० ग्रॅम एमडी जप्त केले आहे. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नालासोपारा परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांकडून यापूर्वीही अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. काही परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली असली, तरी काही व्यक्तींकडून गुप्तपणे हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे तपासात आढळून येत आहे.या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेची सखोल चौकशी सुरू असून, तिच्याकडून अंमली पदार्थांच्या पुरवठा करणाऱ्या नेटवर्कची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. तसेच फरार झालेल्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.