बुलडाणा,
neet-paper-controversy-protest : दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरलीक प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ दि.२२ जुलै रोजी बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, तरुण वर्ग, महिला तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करत नीट पेपरलीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक व जबाबदार भूमिका घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.