नागपूर,
neet दिल्लीतील आंदोलन हे पूर्णपणे विद्यार्थ्यांचे नसून, ते प्रायोजित आहे. 'नीट' आंदोलन हे राजकीय षडयंत्र असून, त्यात संधीचे सोने करण्याचा विरोधकांचा अजेंडा आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी नागपुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचा लेखाजोखा सादर केला.
विकासाला उत्तर नाही म्हणून आंदोलने चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विकासाचा झंझावात सुरू आहे. विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यास कोणताही सकारात्मक मुद्दा उरलेला नाही. त्यामुळेच आंदोलनांच्या माध्यमातून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नीट पेपरफुटीवर स्पष्टीकरण
नीट पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करताना ते म्हणाले, या प्रकरणात सात ते आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई होईल. त्यामुळे या मुद्याचे राजकारण करण्याऐवजी तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे.
नक्षलवादाला आळा; निधी रोखला
सरकारने नक्षलवाद मोडून काढण्यात मोठे यश मिळविले आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. नक्षलवादाला पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या संघटनांचा बाहेरून येणारा निधी रोखण्यात आला आहे. त्यामुळे आता आंदोलनांच्या माध्यमातून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या आंदोलनामागे कोण आहे आणि त्यासाठी निधी कुठून आला, हे लवकरच उघड होईल, असे चव्हाण म्हणाले.
राज्यभर सेवा उपक्रम
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सेवा उपक्रम राबविले जात आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या कार्याला सामाजिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान लाभावे, यासाठी भाजपा कार्यकर्ते राज्यभर विविध उपक्रम राबवीत आहेत. राज्यातील प्रत्येक मंडळात सेवा यज्ञ आयोजित केला जात आहे. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करण्यात येत आहे, असे चव्हाण म्हणाले. नागपुरातही विविध ठिकाणी आरोग्य तपासणी आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडले. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.